ठाण्यामधील पाचपाखाडी येथील गॅसची पाइप लाइन शुक्रवारी सकाळी फुटली. सर्व्हिस रोडवर सुरु असणाऱ्या कामामुळे पाइप लाइनला धक्का लागल्याने ती फुटली.
ठाण्यामधील पाचपाखाडी भागातील सर्व्हिस रोडवर महानगरपालिकेच्या माध्यमातून खोदकाम सुरु आहे. याच कामादरम्यान येथून जाणाऱ्या गॅसच्या पाइप लाइनला जेसीबीचा धक्का लागला. त्यामुळे ही पाइप लाइन फुटली आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर येऊ लागला. अगदी काही फुटांपर्यंत गॅस बाहेर पडताना दिसत होते. तातडीने अग्निशामन दल आणि गॅस कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पाइप लाइनमधून होणारा गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाच ते सहा हजार ठाणेकरांना पाइप लाइनद्वारे होणार गॅस पुरवठा खंडित झाला आहे.
याआधीही १३ सप्टेंबर महिन्यामध्ये ठाण्यातील पाचपाखाडी भागात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वृक्ष तोडताना महानगर गॅसची वाहिनी फुटली. सायंकाळच्या वेळेत हा प्रकार झाल्याने सुमारे पाचशे घरांना याचा फटका बसला आहे. रात्री उशिरापर्यंत या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम महानगर गॅसकडून सुरू होते.