ठाणे : करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनाअंतर्गत जिल्ह्यात २०,३२६ खाटा उपलब्ध करून ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी ९ हजार ४४ प्राणवायू खाटांची सुविधा आहे.
मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये मध्ये आढळून आलेल्या जिल्ह्यातील एका दिवसाची सर्वोच्च रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्याच्या तुलनेत प्राणवायूची तीनपटीने उपलब्धता करण्याचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जिल्ह्यात २४ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक म्हणजेच ८३ हजार उपचाराधीन रुग्णसंख्या होती. त्यांच्या उपचारासाठी २१९ मेट्रीक प्राणवायूची आवश्यकता होती. सद्दस्थितीत या संख्येच्या तीनपट म्हणजे ६५७ मेट्रीक टन प्राणवायू उपलब्धतेसाठी नियोजन केले जात आहे.
प्राणवायूचे नियोजन
जिल्ह्यात हवेतून प्राणवायूची निर्मिती करणारे एकूण ३१ प्रकल्प प्रस्तावित आहेत. यापैकी २६ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून त्यातून प्रतिदिन ४५ मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती केली जात आहे. तसेच सध्या ६७२ मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू साठा करण्याची क्षमता विकसित केली आहे. तसेच अतिरिक्त २७० मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू साठवणूक क्षमता विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.