ठाणे : मुंब्र्यातील दौलत नगर येथील लकी कंपाऊंड इमारतीच्या डी-विंगमधील सज्जाचा काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यु तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आठ दिवसांपुर्वी घडली होती. त्यापाठोपाठ ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील साई ममता इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून दोन जण जखमी झाले. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना वाढू लागल्या आहेत.

मुंब्र्यातील दौलत नगर येथील लकी कंपाऊंड इमारतीच्या डी-विंगमधील सज्जाचा काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यु तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आठ दिवसांपुर्वी घडली होती. या दोघी सासू सुना होत्या. तर दोन दिवसांपुर्वी दिवा परिसरातील एन.आर.नगर, गावदेवी मंदिराजवळ असलेल्या संजय म्हात्रे चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळल्याचा प्रकार दोन दिवसांपुर्वी घडला होता. याठिकाणी तीन सदनिकांमध्ये अडकलेल्या एकूण दहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासनाने इमारतीमधील ३० सदनिका रिकाम्या केल्या होत्या. त्यापाठोपाठ बुधवारी सकाळी ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील साई ममता इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून दोन जण जखमी झाले. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इमारतीचा सज्जा, गॅलरी भाग तसेच छताचे प्लास्टर कोसळण्याचे प्रकार वाढू लागल्याचे चित्र आहे.

वागळे इस्टेट येथील शिवाजीनगरमधील डिसोजा वाडी परिसरात साई ममता ही पाच मजली इमारत आहे. ही इमारत सुमारे ३० वर्षे जुनी आहे. या इमारतीत एकूण १२ खोल्या आहेत. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अनिश वालजी देवलिया यांची २०२ क्रमांकाची सदनिका आहे. या छताचे प्लास्टर बुधवारी सकाळी कोसळले. यात वंश अनिश देवलिया (११) आणि विवेक अनिश देवलिया (२२) हे किरकोळ जखमी झाले. हे दोघे झोपेत असताना प्लास्टर त्यांच्या अंगावर पडले.

वंशच्या डाव्या पायाला तर विवेकच्या उजव्या पायाला इजा झाली आहे. या घटनेची माहिती माजी नगरसेवक दिपक वेतकर यांनी दिल्यानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत तक्रार संबंधित विभागाला कळविली असून संबंधिताना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाकडून सांगण्यात आले.