scorecardresearch

येऊरमध्ये प्लास्टिकचा चारा

बेजबाबदार पर्यटक आणि सुस्त प्रशासनामुळे येऊर जंगलाचा उकिरडा अधिक व्यापक होण्याच्या मार्गावर आहे.

plastic
येऊरमध्ये प्लास्टिकचा चारा

गायींच्या आरोग्याला धोका; कचऱ्याच्या ढीगांमुळे उकिरडा 

बेजबाबदार पर्यटक आणि सुस्त प्रशासनामुळे येऊर जंगलाचा उकिरडा अधिक व्यापक होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग रोजच साठत आहेत; परंतु ते उचलण्यासाठीची कार्यवाही हाती घेण्यात न आल्याने त्याचा थेट परिणाम येथील वनसंपदा आणि प्राण्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जंगलात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, ग्लास, प्लास्टिक-थर्माककोलपासून बनवलेल्या ताटांचा ढीग रोजच पडत आहे. हे प्लास्टिक सध्या गायींसाठी चारा म्हणून उपयोगी पडत असल्याने त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. यात काही गायी आणि त्यांचे वासरे दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या भागातील प्राणीप्रमी पराग शिंदे यांनी ही बाब प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिली आहे; मात्र त्यावर अधिकाऱ्यांनी डोळ्यांवर कातडे ओढून बसण्यातच धन्यता मानल्याने येऊरमधील बऱ्याच भागांतील प्लास्टिकचा कचरा अद्याप उचलला गेलेला नाही. प्लास्टिक चारा म्हणून खाणाऱ्या गायी कालांतराने मरण पावतात. त्यांचे मृतदेही नंतर कोणी उचलत नाही. त्यामुळे ते कुजूनन सर्वत्र रोगराई पसरण्याची शक्यता अधिक असते, असे शिंदे म्हणाले.

गाय आणि बैल अधिक प्रमाणात प्लास्टिक खातात. त्यांना वरचे दात नसतात. त्यांचे ओठही पुरेसे संवेदनशील नसतात. त्यामुळे चाऱ्यापासून प्लास्टिकच्या पिशव्यांपर्यंत गुरे काहीही खातात. अर्थातच पचनसंस्था प्लास्टिकचे पचन करू शकत नाही, त्यामुळे हे प्लास्टिक पचनसंस्थेमध्ये साठून राहते आणि पचनसंस्थेमध्ये अडथळे निर्माण होतात. गाईच्या नाकावटे अन्न बाहेर येते, तेव्हा पचनसंस्थेमधील अडचण लक्षात येते. पचनसंस्थेतील हा अडथळा दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया झाल्यावर तिची काळजी घेणे जिकीरीचे होते. या गुरांची जगण्याची शक्यता कमी असते. केवळ प्लास्टिकच नाही तर उकिरडय़ावरील कचऱ्यामधून लोखंडाचे तुकडे, खिळेसुद्धा गायींच्या पोटात जातात. घोडे किंवा इतर प्राण्यांचे ओठ, दात संवेदनशील असतात. त्यामुळे काय खायचे नाही हे त्यांना कळते. गायींच्या बाबतीत ही शक्यता नसल्याने गवताला बांधलेल्या लोखंडी ताराही त्यांच्या पोटात जाऊ शकतात. टोकदार वस्तूंमुळे त्याचे आतडे फाटत जाते. अखेर यामुळे त्यांच्या हृदयावर परिणाम होतो. अचानक हृदयाची क्रियाही बंद पडते, असे ‘सोसायटी फॉर प्रीव्हेन्शन अगेन्स्ट क्रुएॅलिटी टू अ‍ॅनिमल’ (एसपीसीए)च्या डॉ. विक्रम दवे यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाचे दुर्लक्ष

येऊर हे ठाण्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनल्यामुळे येथे अनेक लहान-मोठी दुकाने सुरूझाली आहेत. त्यामुळे वस्तूंच्या विक्रीबरोबरच प्लास्टिकचे प्रमाणही वाढत आहे. येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक आढळते. कचरा उचलण्यासाठी पालिका प्रशासन दिरंगाई करत असल्याने दोन-दोन दिवस कचऱ्याचे ढिग पडून राहतो. या कचऱ्यामध्ये आढणारे अन्न पदार्थ खाण्यासाठी प्राणी येथे येत असतात. प्लास्टिकच्या पिशव्यामधील अन्न खाण्यासाठी ते पिशवीसटक अन्न ग्रहन करतात, अशी माहिती प्राणीप्रमींनी दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-04-2017 at 00:55 IST