अंबरनाथ नगरपालिकेची अनास्था, कचरा व्यवस्थापनात पुन्हा अपयशी

लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या अंबरनाथ शहरात दीड वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्प अंतर्गत कोकाकोला कंपनीच्या मदतीने प्लास्टिक पुनर्वापर व्यवस्थापन कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. सुमारे १८ प्रकारच्या कचऱ्याचे विलगीकरण करून त्याला पुनर्वापरासाठी पाठवत त्या माध्यमातून कचरावेचकांना रोजगार आणि प्लास्टिकवर प्रक्रिया केली जात होती. मात्र अवघ्या काही महिन्यांत हा प्रकल्प बंद पडला आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या अनास्थेमुळे आणखी एक प्रकल्प बंद पडल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत घनकचरा व्यवस्थापनाला गेल्या काही वर्षांत प्राधान्य दिले जात असले तरी अनेक मोठमोठय़ा शहरांना त्यात यश येताना दिसत नाही. स्वच्छ सर्वेक्षणात प्रत्येक वर्षांत मोठी आघाडी घेणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेला दोन वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पांतर्गत कोकाकोला कंपनीच्या मदतीने प्लास्टिक पुनर्वापर व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्याची राज्यात संधी मिळाली. नोव्हेंबर २०१९ मध्ये दास ग्रीन अर्थ सोल्युशन या कंपनीच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पामुळे शहरातील सुमारे ३८ कचरा गाडय़ांमधून १५ मेट्रिक टन कचरा पेटीतला कचरा पालिका मुख्यालयाच्या मागच्या बाजूस असलेल्या सर्कस मैदानात आणला जात होता. तेथे पालिकेने जागा, छप्पर, वीज आणि पाणी उपलब्ध करून दिले होते. त्याबदल्यात १५ मेट्रिक टन कचऱ्याचे प्लास्टिक, कापड, काच, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा सुमारे १८ प्रकारांत वर्गीकरण होत होते. या वर्गीकरणाच्या कामामुळे २० ते २५ कचरावेचकांना दररोज सरासरी ३०० ते ४०० रुपयांचे उत्पन्न मिळत होते. तर वर्गीकरण झालेला कचरा पुनर्वापरासाठी विविध कंपन्यांना पाठवला जात होता.  यापूर्वी हा कचरा भंगारात विकला जात असे. या प्रकल्पामुळे शहरातल्या प्लास्टिक आणि इतर सुक्या कचऱ्याच्या पुनर्वापराला शिस्त लागली होती. त्यातून झाडू आणि इतर तत्सम वस्तूंची निर्मिती केली जात होती. राज्यातला हा पहिला प्लास्टिक पुनर्वापर व्यवस्थापन प्रकल्प होता. त्यामुळे राज्यात हा प्रकल्प आदर्श ठरू शकणार त्यापूर्वीच प्रकल्प बंद पडल्याचे समोर आले आहे. याबाबत पालिकेचे आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांना विचारले असता, करोना संकटामुळे हा प्रकल्प बंद केला होता. मात्र तो लवकरच सुरू केला जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थानसाठी हा उपयुक्त प्रकल्प असून, करोना संकटामुळे हा प्रकल्प काही काळ बंद केला होता. मात्र या प्रकल्पाची भविष्यातील क्षमता पाहता, संस्थेच्या मागणीनुसार मोठय़ा भूखंड शोधला जात असून तेथे अद्यवत यंत्रणा उभारत लवकरच हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

डॉ. प्रशांत रसाळ,  मुख्याधिकारी

..म्हणून राज्यात अंबरनाथची निवड

२०१७ साली राज्य शासनाच्या पहिल्या नगरविकास दिनानिमित्त राज्यात उत्कृष्टपणे काम करणाऱ्या नगरपालिकांमध्ये अंबरनाथ नगरपालिका सर्वोत्कृष्ट ठरली होती. त्यासाठी नगरपालिका नागरी गौरव आणि ४ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्यापूर्वी कचरामुक्त आणि सर्वाधिक वैयक्तिक शौचालये बांधल्याने अंबरनाथ नगरपालिकेचा गौरव झाला होता. त्यामुळे राज्यात अंबरनाथ नगरपालिकेची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली होती. गेल्या वर्षांत स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात तिसरा क्रमांक आल्यानेही शहर चर्चेत आले होते.