कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील टोरेस ज्वेलर्स या नाममुद्रा असलेल्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपल्या प्रदर्शनीय दालनाच्या माध्यमातून बनावट सोने, चांदीचे, हिऱ्याचे दागिने, ग्रहांचे खडे खरे आहेत असे दाखवून ग्राहकांना विकले. या खरेदी रकमेवर दर आठवड्याला चार ते अकरा टक्के व्याज देण्याचे, याशिवाय विजेत्या ग्राहकांना किमती वस्तू देण्याचे आश्वासन देऊन ग्राहकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली आहे.
या फसवणूक प्रकरणी ठाणे येथील राबोडी पोलीस ठाण्यात टोरेस ज्वेलर्सच्या चालकांविरुध्द संघटित गुन्हेगारी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय पाबळे यांनी दिली. टोरेस जवाहिऱ्याने काही शहरांमध्ये ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी ग्राहकांनी स्थानकि पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. ठाणे शहर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग याप्रकरणाचा तपास करत आहे.टोरेस ज्वेलर्सच्या प्रदर्शनीय दालनात सोन्या, चांदीचे खरे भासणारे दागिने, हिऱ्यांंसारखे दिसणारे प्रयोगशाळेत निर्मित मोजेनाईट खडे विक्रीसाठी दालनात ठेवले होते. या दागिन्यांची झळाळी पाहून ते खरेच आहेत, असेच ग्राहकाला वाटत होते. त्यामुळे ग्राहकांनी हे दागिने जवळील पुंजीप्रमाणे खरेदी केले होते. या दागिने खरेदीच्या रकमेवर दर आठवड्याला चार ते ११ टक्के दराने पुढील ५२ आठवड्यापर्यंत आकर्षक परतावा देण्याचे आमिष, सोडतीमध्ये घर, वाहन देण्याचे आमिष दाखविले होते.
कल्याण मधील टोरेस ज्वेलर्सच्या माध्यमातून ज्या ग्राहकांनी दागिने खरेदी केली आहेत. ज्यांची खरेदीत आणि वाढीव व्याजाच्या आमिषाने फसवणूक झाली आहे, अशा ग्राहकांंनी अद्यापर्यंंत पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल केला नसेल तर त्या ग्राहकांनी ठाणे येथील आर्थिक गु्न्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात येऊन गुन्हा दाखल करावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय पाबळे यांनी केले आहे.