लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर भागात आरोग्य उत्तम राहावे म्हणून चालण्यासाठी गेलेल्या एका ४२ वर्षीय महिलेला मोटार चालकाने भरधाव वाहन चालवून धडक दिल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला होता. या प्रकारानंतर ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि धावपटू डॉ. महेश बेडेकर यांनी ठाणे पोलिसांना पत्र लिहिले आहे. आम्ही केलेल्या मागण्यांची पूर्तता केली असती तर हा अपघात घडला नसता, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मी तुम्हाला एक हतबल, निराश, सामान्य अराजकीय नागरिक म्हणून माझा अपघात होण्यापूर्वी पुन्हा विनंती करतो की, हा विषयी अतिशय गांभीर्याने घेऊन मागण्याची दखल घ्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
घोडबंदर येथील आझादनगर भागात राहणाऱ्या निलम पटवर्धन (४२) या सोमवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास येऊरमध्ये चालण्यासाठी गेल्या होत्या. उपवन जवळ असलेल्या येऊरच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर निलम पोहचल्या असता, मागून येणाऱ्या भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. निलम यांच्या पायाला अस्थिभंग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
आणखी वाचा- चालण्यासाठी गेलेल्या महिलेचा येऊरमध्ये भरधाव मोटारीमुळे अपघात, मुंबईतील घटनेची पुनरावृत्ती
वरळी येथील सी-फेस परिसरात धावपटू राजलक्ष्मी रामकृष्णन या धावत असताना त्यांना भरधाव मोटारीने दिली होती. या धडकेत राजलक्ष्मी यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ठाण्यातील धावपटूंनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग आणि महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना पत्रव्यवहार केला होता. पहाटे ५ ते सकाळी ८ यावेळेत चालण्यासाठी आणि धावण्यासाठी जाणाऱ्या नागिरकांना सुरक्षितरित्या चालता यावे आणि सराव करता यावे यासाठी भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. परंतु प्रशासनाकडून उपाययोजना झाल्या नसल्याचा दावा धावपटूंनी केला आहे. मंगळवारी डॉ. महेश बेडेकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना पत्र लिहीले. मागण्या त्यावेळीच मान्य झाल्या असत्या तर अपघात झाला नसता, असे पत्रात म्हटले आहे. तसेच मी तुम्हाला एक हतबल, निराश, सामान्य अराजकीय नागरिक म्हणून माझा अपघात होण्यापूर्वी पुन्हा विनंती करतो की, हा विषयी अतिशय गांभीर्याने घेऊन मागण्याची दखल घ्यावी असेही त्यामध्ये म्हटले आहे.
येऊर, उपवन भागात हजारो नागरिक सकाळच्या वेळेत आरोग्य उत्तम राहावे यासाठी चालत असतात. येऊर येथील घटना अतिशय गंभीर असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. येथे पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे. तसेच सकाळी दोन ते अडीच तासांसाठी येथील रस्ते केवळ चालण्यासाठी खुले ठेवणे आवश्यक आहे. यासंदर्भात मंगळवारी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. -डॉ. महेश बेडेकर, धावपटू.