आता केवळ आठच स्थानके, एक स्थानक बाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या दहिसर ते मीरा-भाईंदर या मेट्रोच्या मार्गातून भाईंदर पूर्वचा परिसर वगळण्यात आला आहे. मेट्रो आता केवळ भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंतच जाणार आहे. आधीच्या आराखडय़ानुसार मेट्रो भाईंदर पश्चिम आणि भाईंदर पूर्व येथील इंद्रलोकपर्यंत जाणार होती. परंतु तांत्रिक कारणास्तव मेट्रो केवळ भाईंदर पश्चिमेलाच नेण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी दहिसर ते मीरा-भाईंदर या मेट्रो मार्गाचे कल्याण येथे डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातींमधून दहिसर चेकनाका ते मीरा-भाईंदर या मेट्रोमार्गाचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आराखडय़ात मेट्रो केवळ भाईंदर पश्चिम भागातच येणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या मार्गासाठी आठच स्थानके असणार आहेत.

याआधीच्या मेट्रोच्या आराखडय़ानुसार मेट्रो गोल्डन नेस्ट चौकातून डावीकडे भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत आणि उजवीकडे भाईंदर पूर्व भागातील इंद्रलोकपर्यंत जाणार होती. या संपूर्ण मार्गावर एकंदर नऊ स्थानके बांधण्यात येणार होती. मात्र आता जाहीर झालेल्या आराखडय़ानुसार भाईंदर पूर्व भागातील इंद्रलोकपर्यंतचा मेट्रो मार्ग रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील गोडदेव गाव परिसरातील महाराणा प्रताप स्थानक कमी झाले असून आता या मार्गावर आठच स्थानके बांधण्यात येणार आहेत.

तांत्रिक कारणास्तव भाईंदर पूर्व भाग मेट्रो मार्गातून वगळण्यात आला आहे. आधीच्या आराखडय़ानुसार गोल्डन नेस्ट चौक येथे मेट्रोला डावीकडे आणि उजवीकडे अशी दोन वळणे होती. या दोन वळणांसाठी अतिरिक्त मार्गिका बांधावी लागणार होती, परंतु गोल्डन नेस्ट येथे यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध नसल्याने मेट्रो उजवीकडे वळवणे अशक्य असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. परिणामी सध्या तरी मेट्रो इंद्रलोकच्या दिशेने जाणार नसल्याचे स्पष्ट  झाले आहे.

स्थानकाचा वाद संपुष्टात

भाईंदर पूर्वकडे इंद्रलोक भागात जाणाऱ्या मेट्रोसाठी याआधी महापालिकेच्या क्रीडा संकुलाजवळ स्थानक देण्यात आले होते. मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने या स्थानकाला महाराणा प्रताप हे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. मेट्रो स्थानक गोडदेव गाव परिसरात होणार असल्याने स्थानकाला गोडदेव हे नाव द्यावे, असा शिवसेनेचा आग्रह होता. परंतु ही मागणी फेटाळण्यात आली. मेट्रो स्थानकाला गोडदेव नाव द्यावे यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र आता हा मार्गच रद्द झाल्याने स्थानकाच्या नावाचा वाद सध्यातरी निकाली निघाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi lays foundation stone for metro projects
First published on: 19-12-2018 at 02:00 IST