शहापूर : भिवंडीच्या शासकीय गोदामातून शहापुर तालुक्यातील अघई येथील रेशन दुकानासाठी निघालेले धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहापुर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तहसील प्रशासनानेही स्वतंत्र चौकशी हाती घेतली आहे. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केलेल्या झाडाझडतीत खासगी गोदामात तब्बल ६९५ क्विंटल तांदूळ जास्तीचा आढळून आला. हा तांदूळ शासनाकडून रेशन दुकानदारांना वितरित होणारा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित गोदाम सील करण्यात आले आणि गोदाम मालक रमेश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी येथील गोदामातून शहापुर तालुक्यातील अघई येथील रेशनिंग मध्ये जाणारा गहू आणि तांदळाचा तब्बल १६५ क्विंटल धान्याने भरलेला ट्रक शहापुरच्या एका खासगी गोदामासमोर आढळून आला होता. पुरवठा अधिकाऱ्यांनी याप्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ट्रक व धान्य जप्त करून ट्रक चालक एजाज शहा याला अटक केली असून यातील एक आरोपी फरार आहे. या गंभीर घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. यामध्ये भिवंडी येथील गोदाम ते शहापुर तालुक्यातील अघई चे रेशन दुकान यामधील साखळी उलगडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणाच्या अनुषंगाने शहापुरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी अमृता सूर्यवंशी यांनी ज्या खासगी गोदामालगत धान्याचा ट्रक उभा होता त्या गोदामाची झाडाझडती घेतली. त्यामध्ये धान्याच्या पावत्या प्रत्यक्ष मिल व गोदामा मधील आढळून आलेला साठा यामध्ये तफावत आढळून आली असून ६९५ क्विंटल तांदूळ जादा आढळून आला आहे. तसेच या तांदळामध्ये शासनाकडून वितरित होणारा (एफ आर के) तांदूळ निदर्शनास आल्याने राईसमील व खासगी गोदामांना सील ठोकून गोदाम मालक रमेश अग्रवाल यांच्याविरुद्ध पुरवठा निरीक्षक गीतांजली गोरे यांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धान्याचे गोदाम व रेशनिंग दुकानांची तपासणीचे व त्यामधील गोदामपाल, वाहतूक ठेकेदार, सब वाहतूक ठेकेदार यांच्या चौकशीचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन गोरगरिबांच्या तोंडचा हक्काचा घास कोणाकडूनही हिरावून घेतला जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
