नवरात्रोत्सवासाठी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त
नवरात्रोत्सवात गरबा खेळताना महिलांची छेडछाड होऊ नये आणि सोन्याचे दागिने आणि मोबइलची चोरी होऊ नये यासाठी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके गरब्यातील रोड रोमिओ आणि चोरटय़ांवर नजर ठेवणार आहेत. तसेच नवरात्रोत्सवासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांचा जागता पहारा सुरू आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. तर काही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून गरब्याचे आयोजन करण्यात येत असते. मात्र, अनेकदा गरब्यादरम्यान तरुणी किंवा महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडतात. तर देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचे प्रकारही घडतात.
अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून त्यांनी नवरात्रोत्सवापूर्वी उत्सव मंडळांसोबत एक बैठक घेतली होती. त्यामध्ये मंडळांना उत्सवाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या होत्या. तसेच उत्सवाच्या काळात गर्दीचे नियोजन कसे करायचे याबाबतही पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले आहे. असे असले तरी गरब्यामध्ये छेडछाड होऊ नये आणि चोरी होऊ नयेत यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. अशा घटनांच्या बाबतीमध्ये सांस्कृतिक मंडळांनाही पोलीस दक्षता पथकांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
‘निर्भया’ पथक कार्यरत
ही पथके गरब्याच्या ठिकाणी नजर ठेवून असतात, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली. याशिवाय शहरातही ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तर ग्रामीण पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसांची पथके तयार केली असून ही पथके गरब्याच्या ठिकाणी नजर ठेवून असतात. तसेच ‘निर्भया’ नावाचे एक पथकही या कालावधीत कार्यरत आहे. या पथकामध्ये एक अधिकारी आणि चार पोलीस कर्मचारी आहेत, अशी माहिती ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी दिली.