सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळामुळे आघाडीत बिघाडी
ठाणे : महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्थापन केलेल्या समितीची पहिली बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. परंतु ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनाच्या घटनेमुळे शिवसेनेने ही बैठक रद्द केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कळवा येथील आतकोनेश्वरनगरमधील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमादम्यान महापौर नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘मिशन कळवा’ असा नारा देत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. यामुळे ठाण्यातील आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यापाठोपाठ महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी होण्याची शक्यता गेल्या काही महिन्यांपासून वर्तविली जात आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ठाणे जिल्ह्यातील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढल्या जाणार असल्याचे सांगितले होते.
ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी द्विसदस्यीय समिती गठित केली होती. त्यामध्ये महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा समावेश होता. या समितीची पहिली बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. परंतु बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यासह काही नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनामुळे शिवसेनेने बैठकच रद्द केली आहे. या संदर्भात महापौर म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
शिवसेनेशी नव्हे, आयुक्तांशी वाद
महाविकास आघाडीबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे दोन्ही वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आमचे शिवसेनेशी भांडण नाही. आमचे भांडण आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याशी आहे. आयुक्त शर्मा हे नगरसेवकांशी संवाद साधून त्यांच्या प्रभागातील कामांसाठी निधी उपलब्ध करून देत नाहीत. आयुक्त हे स्वत:ला सर्वसाधारण सभेपेक्षा मोठे समजत असतील तर त्यांना घेराव घालू असे राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले.