ठाणे : मुंबई येथील वरळी भागातील एनएससीआय डोम येथे शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विजयी मेळावा नुकताच पार पडला. यानंतर शिंदे यांच्या युवा सेनेने टेंभीनाका येथे बॅनरद्वारे व्यंगचित्रातुन प्रतिउत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे, मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची.. असे व्यंगचित्र असून त्याचे बॅनर लावत शिंदेंच्या युवा सेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचले होते. परंतु हे बॅनर काढण्यासाठी थेट पोलीस टेंभीनाक्यावर पोहचले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी शिंदेंच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून येथील बॅनर हटविला. यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर राज ठाकरे यांची स्तुती केली.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेला विजयी मेळावा शनिवारी वरळीत पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र आले होते. या मंचावरून भाषण करताना दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारवर टिका केली. तसेच या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले. त्याचबरोबर त्यांनी मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिला होता. त्याला त्याला शिंदेंच्या युवा सेनेने व्यंगचित्रातुन प्रतिउत्तर दिले.
परंतु या बॅनरवर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यानंतर बॅनर काढण्याची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी शिंदे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होत, बॅनरवरील कारवाईस विरोध केला. आम्ही कायदा सुव्यवस्थेला अडथळा निर्माण केला नाही. महापालिकेने कारवाई करायची असल्यास शहरातील इतर बॅनरवर कारवाई करावी असे युवासेनेने म्हटले. या कारवाई दरम्यान, वाहतुक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर महापालिकेच्या पथकांनी हा बॅनर काढून नेला. या कारवाई दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण नि्माण झाले होते.उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे अस्तित्त्व संपले आहे, राज ठाकरे हे मराठी माणसासाठी पूर्वीपासून लढत आहे. परंतु उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना निवडणूका आल्यावर हे सर्व आठविते असा आरोपही त्यांनी केला.
काय होता बॅनर
मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची यांचा व्यंगचित्रात समावेश होता. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचेही व्यंगचित्र असून त्यासोबत मराठी माणसाची एकजूट अशीच राहुद्या, असा मजकूर लिहून त्यांना टोला लगावण्यात आला होता.