ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये रिक्षा-टॅक्सी चालक व मालकांकरिता कार्यरत असलेल्या विविध संघटनांना राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याने  रिक्षाचालकांच्या मनमानीकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. परिवहन विभागाने वाहतूक नियमांवर बोट ठेवून कारवाई सुरू केल्यानंतर ठाण्यात बंद पाळणाऱ्या रिक्षाचालकांच्या मोच्र्यात राजकीय पक्षांचे झेंडे फिरत होते. मात्र, प्रवाशांवर होणाऱ्या अन्याय आणि लुटीविरोधात आजवर एकाही राजकीय पक्षाने साधा निषेधही नोंदवला नाही.  हे होत असताना प्रवाशांच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी एकही प्रवासी संघटना ठाण्यासारख्या शहरात उभी राहू नये, हेही दुर्दैवच.
भाडे नाकारणे हा जणू आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशा तोऱ्यात वर्षांनुवर्षे ठाणे, कल्याणातील रिक्षा चालक वावरत असतात. विशेषत: सायंकाळी कामावरून दमूनभागून घरी परतणाऱ्या प्रवाशांचा अंत पाहायचा असा पणच यापैकी काहींनी केलेला असतो. रिक्षाची वाट पाहात चौका-चौकामध्ये ताटकळत उभे असणारे प्रवासी ठाण्यात जागोजागी दिसतात. असे असताना भाडे नाकाराल तर याद राखा, असा दम या रिक्षा चालकांना भरणारा नेता ठाण्यात अपवादानेच दिसतो. याउलट रिक्षाचालकांच्या विविध समस्यांकरिता एखाद्या जरी रिक्षा संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले तर त्यामागे उभे राहण्याची जणू स्पर्धाच येथील राजकीय पक्षांमध्ये लागलेली दिसते. मध्यंतरी ठाण्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका बडय़ा नेत्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रेल्वे स्थानक परिसरात दौरा काढला आणि भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना बेदम चोप दिला. रेल्वे स्थानकालगतच गावदेवी नाका तर प्रवाशांच्या छळवळणुकीचा थांबा आहे. हा नेता तेथे शिरला आणि प्रवाशांना मदत करू लागला. पण हे सर्व निवडणुकीपुरतेच मर्यादित होते.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि ठाणे वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त पथकाने गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळणारे अधिकारीही तसे विरळच. असे असताना ठाणे आरटीओ आणि वाहतूक विभागाने प्रवाशांच्या हितासाठी तब्बल ९०० रिक्षा चालकांवर दंडाची कारवाई केली. पोलिसांसोबत आरटीओचे अधिकारीही रस्त्यावर उतरल्याने ही संयुक्त पथकामार्फत नियमांवर बोट ठेवून होत असलेली कारवाई रिक्षा चालकांना जाचक वाटू लागली. यामुळे न्याय्य हक्काची भाषा करीत संघटनांनी अचानकपणे ‘रिक्षा बंद’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. हे होत असताना त्यांच्या मदतीकरिता एकही राजकीय पक्ष पुढे आला नाही.  ठाणे शहरात कार्यरत असलेल्या रिक्षा-टॅक्सी युनियनच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाहिली तर त्यामध्ये अनेक युनियनचे पदाधिकारी राजकीय पक्षाशी निगडित आहेत. याशिवाय, त्यामध्ये काही नगरसेवकांचाही समावेश आहे. यामुळे आंदोलनादरम्यान अनेक रिक्षांवर विविध राजकीय पक्षांचे झेंडे दिसून येत होते. दादागिरी करत रस्त्यावर उतरलेल्या रिक्षा चालकांच्या संघटनांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला नव्हता. ठाण्यातील मांडवली राजकारणापासून आपण चार हात दूर आहोत हे ठसविण्याचा प्रयत्न भाजपचे स्थानिक पुढारी वारंवार करत असले तरी आंदोलनात आपण प्रवाशांच्या बाजूने उभे राहावे असेही भाजप नेत्यांना वाटले नाही यावरून रिक्षा संघटनांच्या माध्यमातून मतपेटीचे राजकारण कसे सुरू आहे हे दिसून आले.  
नीलेश पानमंद, ठाणे

ठाणे-डोंबिवलीतील  राजकीय रिक्षासंघटना
* एकता रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटना (अध्यक्ष – विनायक सुर्वे, शिवसेना)
* विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी युनियन (अध्यक्ष – भाई टिळवे अपक्ष नगरसेवक)
* ठाणे ऑटो मेन्स रिक्षा युनियन (अध्यक्ष – रवी राव, काँग्रेस)
* भारतीय जनता पार्टी रिक्षा-टॅक्सी युनियन (अध्यक्ष – संजय वाघुले, नगरसेवक)
* जितेंद्रकुमार इंदीसे रिक्षा-टॅक्सी युनियन. (अध्यक्ष – जितेंद्रकुमार इंदीसे रिपाइं)
* राष्ट्रवादी रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ. (अध्यक्ष – भरत चव्हाण, नगरसेवक)
* सम्राट रिक्षा-टॅक्सी युनियन (अध्यक्ष – राजा गवारी, शिवसेना नगरसेवक)
*  मनसे वाहतूक सेना, (अध्यक्ष – आशीष डोके, मनसे)
* संघर्ष रिक्षा-टॅक्सी युनियन (अध्यक्ष – नजीब मुल्ला, राष्ट्रवादी नगरसेवक)
* ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी युनियन
(अध्यक्ष – अरुण खेतले, अपक्ष)
* लाल बावटा रिक्षा चालक मालक युनियन (काळू कोमस्कर – भाकप)
* महाराष्ट्र रिक्षा सेना -(संजय मांजरेकर, शिवसेना)
* रिक्षा चालक-मालक काळी-पिवळी युनियन -शेखर जोशी
* रिपब्लिकन रिक्षा चालक-मालक संघटना. (रामा काकडे – रिपाइं)