उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजकीय पक्षांची लगबग

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून या कालावधीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी पक्षांतील वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवारी शहरात सकाळच्या वेळेत निघणाऱ्या या मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे दोन उमेदवार गुरुवारी सकाळी अर्ज दाखल करणार आहेत. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत: येणार आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळेत निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.  यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली असून या दोन्ही पक्षांनी कोपरी-पाचपखाडी, ठाणे शहर, ओवळा-माजिवाडा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. कळवा-मुंब्रा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी केवळ कळवा-मुंब्य्रातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कोपरी-पाचपखाडी, ठाणे शहर, ओवळा-माजिवाडा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवापर्यंतची मुदत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवसच शिल्लक राहिले आहेत.

ओवळा-माजिवाडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ आता गुरुवारचा मुहूर्त साधून ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गुरुवारी सकाळी भाजपचे उमेदवार संजय केळकर यांची घंटाळी मंदिर येथून जिल्हाधिकारी कार्यालय अशी मिरवणूक निघणार असून यानिमित्ताने भाजप-शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. त्यासाठी दत्तूवाडी ते कौसा स्टेडियम अशी मिरवणूक काढली जाणार आहे.

शुक्रवारीही शहरात कोंडीची शक्यता

कोपरी-पाचपखाडीतील शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे आणि ठाणे शहरातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने कोपरी-पाचपखाडी, ठाणे शहर, ओवळा-माजिवाडा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केलेले नसून गुरुवापर्यंत उमेदवारांची नावे जाहीर होणार असून हे उमेदवारही शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे सर्वच उमेदवार अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन करणार असल्यामुळे शहरात शुक्रवारीही वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अवजड वाहनांचा भार

महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्यामुळे अवजड वाहनांची संख्या रस्त्यावर कमी होती. मात्र, सुट्टीमुळे बंद असलेली अवजड वाहतूक गुरुवारी पुन्हा सुरू होणार असून त्याचबरोबर एकाच वेळी ही वाहने मोठय़ा संख्येने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यात शहरामध्ये सकाळी निघालेल्या मिरवणुका दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेत अवजड वाहतूक सुरू झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच मिरवणुकांमध्ये अंतर्गत मार्गावरही सकाळच्या वेळेत कोंडी होण्याची शक्यता आहे.