अंबरनाथ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला समर्थन देण्याची स्पर्धा गेल्या काही दिवसापासून ठाणे जिल्ह्यात दिसून येते आहे. मात्र या स्पर्धेपासून दूर राहत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या शिवसैनिकांना कोंडीत पकडण्याची खेळी खेळली जात असल्याचे बोलले जाते आहे. सोमवारी अंबरनाथचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांची पोलीस सुरक्षा तांत्रिक कारणावरून काढण्यात आली. तर मंगळवारी उल्हासनगरचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यावर जून महिन्यातल्या एका प्रकारावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकार राजकीय हेतून प्रेरीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातून त्यांना पाठिंबा मिळतो आहे. गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यातील ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील उल्हासनगर महापालिकेतील माजी नगरसेवकांचा मात्र तितकासा पाठिंबा शिंदे गटाला मिळाला नाही. काही माजी नगरसेवक, माजी महापौर गटाने त्यांना पाठिंबा दिला. मात्र शहरातील शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी गटनेते धनंजय बोडारे, अनेक माजी नगरसेवक, ज्येष्ठ शिवसैनिक आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपण ठाकरेंसोबत असल्याचे दाखवून दिले. हा शिंदे गटाला धक्का होता. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाच्या समर्थकांवर झालेल्या हल्ल्यात शिंदे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेच कार्यालय सर्वप्रथम लक्ष्य ठरले होते. त्यामुळे शिवसेनेचा मोठा गट शिंदेविरोधात उभा ठाकला आहे. त्यामुळे या गटाला कोंडीत पकडण्याची खेळी आता केली जात असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचे कारण म्हणजे मंगळवारी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या विरूद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार डॉ. शिंदे यांच्या २६ जून रोजी झालेल्या कार्यालयावरील हल्ल्यानंतर कॅम्प एक चौकात झालेल्या घोषणाबाजीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे इतक्या उशिरा गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. “शिवसैनिकांना गुन्हे नवीन नाहीत. हे असे प्रकार होणार याची अपेक्षा होती, मात्र उल्हासनगर शहरात शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत आहे. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत”, अशी प्रतिक्रिया राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे नुकताच अंबरनाथ नगरपालिकेतील शिवसेनेच्या २० माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिला. यात शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि त्यांच्या गटाच्या नगरसेवकांचा समावेश नव्हता. सोबतच अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या गटाने बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा विरोध केला होता. माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्यासोबत महिला आघाडीने डॉ. किणीकर यांना पालिका मुख्यालयात घेराव घालून त्यांच्याविरूद्ध घोषणाबाजी केली होती. या घटना ताज्या असतानाच सोमवारी शहरप्रमुख वाळेकर यांना पुरवण्यात आलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. पोलीस संरक्षण काढल्याची बाब वाळेकर यांनी मान्य केली असली तरी याबाबत त्यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला समर्थन न दिल्याने अशा पदाधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याची ही खेळी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.