ठाणे : शाळांच्या तसेच सरकारी आस्थापनांच्या भिंतींवर ” झाडे लावा पर्यावरण वाचवा ” अशा आशयाचे सुविचार हमखास दिसून येतात. मात्र याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कितपत होते हे एक न उलगडणारे कोडे आहे. मात्र या उक्तीने प्रेरित होऊन शहापूर तालुक्यातील सावरोली बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या पूनम उबाळे यांनी गेल्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने तब्बल वीस हजार बीजगोळे ( सिड्स बॉल) तयार केले आणि शाळेपासून काही अंतर लांब असणाऱ्या ओसाड मैदानावर त्यांची पेरणी केली आणि याचेच फलित म्हणून सुमारे पाच हजाराहून अधिक झाडे आज त्या ओसाड जागेवर एक बहरली आहेत.

विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात शिकवला जाणारा पर्यावरण विषय फक्त पुस्तकांपुरताच मर्यादित न ठेवता त्याचे प्रत्यक्ष ज्ञान देणे देखील अत्यंत महत्वाचे असते. मात्र सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यावर अनेक शिक्षक आणि शाळा भर देतात. मात्र शहापूर तालुक्यातील सावरोली बुद्रुक या शाळेने पर्यावरण रक्षणाचे धडे प्रत्यक्षात गिरवत इतर शाळांना एक आदर्श घालून दिला आहे. याचे महत्त्वाचे कारण ठरल्या त्या शाळेतील शिक्षिका पूनम उबाळे.

प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्याना पर्यावरणाचे महत्त्व कळावे यासाठी त्यांनी विविध बिया, माती, शेणखतापासून तयार केलेल्या बीज गोळ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे ठरविले. मागील वर्षी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. शालेय वर्ष सुरू झाल्यावर पावसाळ्यात कृषी दिनाचे औचित्य साधत या बीजगोळ्यांचे रोपण करायचे ठरविले. त्यासाठीbशाळा सुरू झाल्यावर गटागटा मधून बीजगोळे जमा करण्यात आले. तर सर्वाधिक बीजगोळे बनवणाऱ्या गटाला बक्षीस देऊन गौरवण्यात ही आले. तर शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या मोकळ्या माळरानावर या बिजगोळ्यांचे रोपण करण्यात आले. तर मागील ९ महिन्यांच्या कालावधीत ही झाडे चांगली वाढू लागली असून तब्बल पाच हजार वृक्ष संपदा या ठिकाणी तयार झाली आहे. त्यामूळे एक शिक्षिका पूनम उबाळे यांनी सर्वांसमोर निश्चितच एक आदर्श निर्माण केला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा या मोकळ्या जागेत असतात. शाळेच्या आजूबाजूला बोर, चिंच, जांभूळ, साग यांची झाडे असतात. यांच्या बिया सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतील आणि कमी पावसातही सहज रुजतील म्हणून या बियांची निवड करण्यात आली.

पर्यावरण संवर्धन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. विद्यार्थ्यांना याची जाणीव लहान वयातच होणे महत्वाचे आहे. याच दृष्टीने गेल्या वर्षी हा उपक्रम हाती घेतला होता. याचे फलित म्हणून मोठी वृक्ष संपदा दिसून येत आहे. ही झाडे टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. हा संपूर्ण उपक्रम केवळ आणि केवळ माझ्या विद्यार्थ्यांमध्ये शक्य झाला. पूनम उबाळे, शिक्षिका, सावरोली