अंबरनाथः कल्याण बदलापूर राज्यमार्गावर वाहतूक व्यवस्थापनासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. येथे बेशिस्त वाहन चालकांमुळे आधीच कोंडी होत असते. त्यात यातील काही सिग्नलच्या तोंडावरच खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. फॉरेस्ट नाका, मटका चौक भागात काही दिवसांवपूर्वी खड्डे खोदण्यात आले. मात्र ते पूर्ववत केले गेले नाहीत. त्यामुळे ज्यावेळी सिग्नलवरून वाहतूक होते त्यावेळी खड्ड्यांमुळे वाहने थांबवून न्यावी लागतात. त्यामुळे वाहनचालकांत संताप आहे.
कल्याण बदलापूर राज्यमार्ग हा कल्याण ते बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागासाठी महत्वाचा आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर अशा या मार्गावर दररोज लाखो वाहने येजा करतात. हा मार्ग अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. रस्त्याच्या विविध भागात अजूनही रूंदीकरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे रस्ता अनेक ठिकाणी अरूंद होतो. रस्त्याच्या काही भागात विद्युत खांब जैसे थे आहेत. त्यामुळे रस्त्याचा काही भाग वापरता येत नाही. रस्त्याच्या मध्यातून भुयारी गटार योजनेच्या वाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे काही मीटर अंतरावर रस्त्याचा भाग असमान झाला आहे.या रस्त्यावरील विजेचे खांब हटले नसल्याने अनेक अपघात झाले आहेत. यात काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यात रस्त्यात दुभाजकाप्रमाणे खड्डे आणि उंचवटे आहे. हा मार्ग फक्त नावापुरताच राज्यमार्ग आहे. मात्र संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाणिज्य आस्थापना, मोठमोठे मॉल उभे राहिले आहेत. परिणामी रस्त्यावरची वाहतूक वाढली आहे. या वाहतुक नियंत्रणासाठी या मार्गावर उल्हासनगर आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र काही बेशिस्त वाहनचालकांमुळे अजूनही वाहतूक व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजल्याचे अनेकदा दिसून येते.
त्यातच काही किरकोळ कामांमध्ये होत असलेल्या बेजबाबदारपणामुळे वाहतूक व्यवस्थापनाचा हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून आले आहे. या मार्गावर फॉरेस्ट नाका हा सर्वाधिक वर्दळीचा चौक आहे. येथे औद्योगिक वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. या भागात काही कामांसाठी बदलापूरच्या दिशेला चौकात रस्ता खोदण्यात आला होता. तो व्यवस्थित पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे सिग्नल सुटल्यानंतर वाहने या खड्ड्यांमध्ये अडकून पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी एका सिग्नलचा वेळ संपला तरी वाहने रांगेत अडकून पडतात. अशावेळी चौकात कोंडी होते. मटका चौकातही असाच प्रकार होतो आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी अशाच एका कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. त्याचा दुचाकी, चारचाकी वाहनांना मोठा फटका बसला होता. आता पुन्हा तेच खड्डे पडल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत.