बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील पश्चिमेकडील परिसर अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच रस्त्यांची दुरवस्था वाढत चालली असून, यामुळे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा हा परिसर असल्याने रेल्वे प्रवासी, रिक्षाचालक, दुचाकीस्वार आणि पादचारी अशा सर्वच नागरिकांना यातून प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही मोजक्याच ठिकाणी खड्डे असले तरी त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होत आहे.

रेल्वेने येणारे प्रवासी स्थानकातून बाहेर पडताच त्यांना पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. स्थानकासमोरील हा परिसर पूर्णपणे उखडलेला असून, रिक्षा व दुचाक्यांना मार्ग काढणे कठीण झाले आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांची खोली समजत नाही आणि अपघात होण्याचा धोका कायम राहतो. पादचाऱ्यांना चिखल व घाणीतून मार्गक्रमण करावे लागते. येथेच शेजारी पालिकेने बसवलेले स्वच्छतागृह आहे. त्याच्या शेजारी कचराकुंडी असते. भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते येथेच कचरा टाकतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. त्यातील कचरा अनेकदा रस्त्यावर येतो. परिणामी खड्डे, दुर्गंधी, चिखल आणि कचऱ्यातून मार्ग काढावा लागतो आहे.यामुळे बदलापूरकरांमध्ये संतापाची भावना आहे.

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेकडून योग्य नियोजन न झाल्याची चर्चा सुरू असून, नागरिकांमध्ये “नगरपालिका काय करतेय?” असा प्रश्न जोरदारपणे विचारला जात आहे. शहरातील इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यांची एवढी दुरवस्था असताना प्रशासनाने अजूनही ठोस उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

उड्डाणपूलही खड्ड्यात

शहरातल्या उड्डाणपुलालाही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. बदलापूर रेल्वे स्थानक परिसराशी जोडणारा उड्डाणपुल हा शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला थेट जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र, पुलावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. पुलावरून वाहने चालवताना अपघात होण्याची भीती सतत जाणवत असून, प्रवाशांचे प्राण धोक्यात आले आहेत.

दरम्यान, बदलापूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात रस्त्यांची अशी दुर्दशा असणे हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे नागरिकांचे मत आहे. नगरपालिकेने तत्काळ खड्डे बुजवून दुरुस्तीची कामे केली नाहीत तर येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.