डोंबिवली : कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा चौकाजवळील ४ जुलै रोजी शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी उद्घाटन केलेल्या काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमधील बारीक खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी स्वार घसरून पडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नव्याने बांधलेल्या या पुलाच्या पृष्ठभागावर महिनाभरात खड्डे पडल्याने प्रवाशांकडून या पुलाच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून पलावा चौकाजवळील एक्सपेरिया माॅल शेजारील काटई निळजे उड्डाण पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दोन महिन्यापूर्वी या पुलाच्या अंतीम टप्प्याचे काम सुरू होते. या पुलाच्या पृष्ठभागावर सीलकोट आणि इतर रासायिक प्रक्रिया केलेला थर टाकून मग हा रस्ता एमएसआरडीसीच्या ठेकेदाराकडून वरिष्ठांच्या परवानगीने सुरू केला जाणार होता. परंतु, दूरवरूनचा काटई निळजे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याचा अंदाज बांधून, एमएसआरडीसीच्या ठेकेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा न करताच घाईने या पुलाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजेश मोरे यांनी आपल्या मार्गदर्शक नेत्यांच्या सल्ल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.

उद्घाटन केल्यानंतर काही मिनिटात एक दुचाकी स्वार काटई निळजे उड्डाण पुलावर घसरला होता. त्यानंतरच्या या पुलावर दुचाकी स्वारासह वाहने घसरू लागल्याने उद्घाटनानंतरच्या दोन तासात पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर ठेकेदाराने या पुलाच्या पृष्ठभागावर बारीक खडी, सिमेंट गिलावा टाकून रस्त्यावरील निसरडेपणा घालविण्याचा प्रयत्न केला. पण पावसामुळे या मिश्रणामुळे चिखल झाला. तो चिखलाचा थर ठेकेदाराला खरवडून काढावा लागला होता. पलावा पूल उभारणी आणि उद्घाटनानंतर या पुलावरील खड्डे, निसरडेपणाची चर्चा आता थांबता थांबत नसल्याने प्रवाशांकडून शासनाने काटई निळजे उड्डाण पुलाच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली जात आहे.

कल्याण ग्रामीणचे माजी आमदार मनसेचे नेते राजू पाटील यांनी काही महिन्यापूर्वीच पलावा चौकाजवळील काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या चौकशीची मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि शासनाकडे केली आहे. आता तर या पुलावर खड्डे पडू लागले आहेत. या पुलावरून प्रवास करताना प्रवाशांना खड्डे चुकवत, रस्त्यावरील बारीक खडे चुकवत प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळेत सुसाट वेगात असलेल्या दुचाकी स्वाराच्या पुलावरील खड्डा निदर्शनास आला नाहीतर दुचाकी स्वार घसरून सरपटत जाण्याची भीती प्रवासी व्यक्त करत आहेत. पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पलावा पुलावरील खड्डे भरणीची कामे प्राधान्याने करावीत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

पलावा चौक भागातील काटई निळजे उड्डाण पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, हे आपण गेल्या वर्षापासून एमएसआरडीसी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणत होतो. पुलाच्या कामाला भक्कम राजकीय आशीर्वाद होता. त्यामुळे त्याची दखल घेतली नाही. आता पावसाने पुलाचे काम किती भक्कम आहे हे दाखवून दिले आहे. आता तरी शासनाने या पुलाच्या गुणवत्तेची चौकशी सुरू करण्याचे आदेश द्यावेत. राजू पाटील माजी आमदार