कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वी खड्डे, चऱ्या भरण्याच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. बहुतांशी कामे अपूर्ण असल्याने अनेक ठिकाणी खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. चऱ्यांवर माती लोटण्यात आल्याने तेथे चिखलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाचे ढिसाळ नियोजन पहिल्याच पावसात उघडे पडल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शहरातील अनेक रस्त्यांवर भूमाफियांनी रस्ते खोदून रात्रीच्या वेळेत चोरुन नळजोडण्या घेतल्या आहेत. डोंबिवली, कल्याण शहरांमध्ये या नळ जोडण्यांसाठी खोदलेले रस्ते डांबर खडी लोटून बंद करण्यात आले आहेत. या खडीवरुन दुचाकी स्वार घसरत आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ चिमणी गल्ली या वर्दळीच्या रस्त्यावर, नेहरू रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता असुनही बांधकाम विभागाने या महत्वपूर्ण रस्त्यावरील खड्डे न बुजविल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>> राज्यमार्गाशेजारीच्या अतिक्रमणांवर एमआयडीसी कार्यालयाकडून कारवाई, अतिक्रमणमुक्त रस्ता ठेवण्याचे आव्हान

महावितरण, मोबाईल सेवा कंपन्या, महानगर गॅस आणि इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांनी शहराच्या विविध भागातील रस्ते गेल्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत खोदले. या कामासाठी पालिकेने सेवा पुरवठादार कंपन्यांकडून लाखो रुपये भरणा करुन घेतले आहेत. दरवर्षी सुमारे ४० ते ५० कोटी रुपये या कंपन्या पालिकेत रस्ते खोदाई दर भरणा करतात. या कंपन्यांची कामे झाल्यानंतर पडलेले खड्डे, चऱ्यांवरील माती, दगडी सुस्थितीत करुन तेथे डांबरीकरण करण्याचे काम पालिका बांधकाम विभागाचे आहे. ही कामे ३१ मे पूर्वी पूर्ण होणे आवश्यक होते. अद्याप डोंबिवली, कल्याण शहरातील अनेक रस्त्यांवर चऱ्यांवर माती, दगडाचे ढीग दिसत आहेत. दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे चऱ्यांवरील माती रस्त्यांवर वाहून आली आहे. पादचाऱ्यांना अशा रस्त्यावरुन चालताना अडचणी येत आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीत देवीचापाडा स्मशानभूमी रस्त्याला बेकायदा इमारतीचा अडथळा

मागील वर्षी तत्कालीन शहर अभियंता सपना कोळी यांनी पावसाळापूर्वीचे खड्डे, चऱ्या भरण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्याचा मोठा फटका मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिक, वाहन चालकांना बसला होता. जून, जुलैमध्ये खड्डे सुस्थितीत करण्याची कामे न झाल्याने डोंबिवली, कल्याण शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे होते. शहर अभियंता कोळी या खड्ड्यांवरुन समाज माध्यमांत लक्ष्य झाल्या होत्या. तीच चूक विद्यमान शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्याकडून होणार नाही अशी नागरिकांची अपेक्षा होती. पण त्यांचेही नियोजन फसल्याने पाऊस सुरू झाला तरी शहरात जागोजागी पावसाच्या पाण्याने भरलेले खड्डे, चऱ्यांचा चिखल, गटार सफाईतील गाळ रस्त्यावर आल्याचे चित्र आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी बांधकाम विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला पूर्वसूचना न देता कल्याण, डोंबिवली शहरांच्या अंतर्गत भागात अचानक दौरे करावेत म्हणजे बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार आयुक्तांच्या निदर्शनास येईल, असे सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी सांगितले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र पावसाळ्यापूर्वीची खड्डे, चऱ्या भरण्याची बहुतांशी कामे पूर्ण केली आहेत. किरकोळ कामे काही ठेकेदाराकडून राहिली असतील ती पूर्ण करुन घेतली जातील, असे सांगितले.