डोंबिवली: डोंबिवली, कल्याणमध्ये बेकायदा इमारती बांधणारे बांधकामधारक आवश्यक शुल्क भरुन महावितरणकडून तात्पुरता वीज पुरवठा बांधकामाच्या ठिकाणी घेतात. एक वर्षासाठी किंवा बांधकाम पूर्ण होईपर्यंत हा वीज पुरवठा महावितरणकडून सुरळीत ठेवला जातो. भूमाफिया नवीन शक्कल लढवून या तात्पुरत्या वीज पुरवठ्याचा आधार घेऊन तो वीज पुरवठा बेकायदा इमारती मधील सर्व खोल्यांमध्ये फिरवतात. इमारतीला कायमस्वरुपी वीज पुरवठा आहे असे घर खरेदीदाराला दाखवून घर खरेदीदारांची फसवणूक करत आहेत, अशा तक्रारी आता वाढत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुलै २०२१ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कल्याण मधील महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून, पालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी असलेल्या कल्याण, डोंबिवलीतील बांधकामांना वीज पुरवठा देण्यात यावा. बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा देऊ नये, असे पत्र दिले होते. अनेक भूमाफिया पालिकेची बनावट कागदपत्र तयार करुन त्या आधारे महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात वीज पुुरवठा घेतात. तो पुरवठा नंतर कायम करुन बेकायदा इमारतीमधील सर्व सदनिकांमध्ये फिरवून त्या सदनिकांची विक्री ग्राहकांना करतात.

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील रहिवासी, उद्योजक धुळीने हैराण

इमारतीत वीज पुरवठा आहे असे समजून ग्राहक घर खरेदी करतात. परंतु, महावितरणने तात्पुरता वीज पुरवठा खंडित केला की सदनिकाधारकांना आपली भूमाफियांनी फसवणूक केल्याचे लक्षात येते. ही फसवणूक टाळण्यासाठी पालिकेच्या १० प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी दोन वर्षापूर्वी आपल्या प्रभाग हद्दीतील एकूण सुमारे ८०० हून अधिक बेकायदा इमारतींची माहिती महावितरण्याच्या विभागीय कार्यालयांमध्ये दिली. या यादीत नाव असलेला माफियांना वीज पुरवठा देऊ नये असे पालिकेचे महावितरणला आदेश आहेत. तरीही काही भूमाफियांनी तात्पुरता वीज पुरवठा कायम स्वरुपी करुन घेऊन बेकायदा इमारतींना वीज पुरवठा सुरू केला आहे, अशी तक्रार माहिती कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी पालिका आयुक्त आणि महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्यांकडे केली आहे.

हेही वाचा >>> ‘साहेब मी गद्दार नाही, ४० गद्दारांना…’ कल्याणमध्ये ‘त्या’ फलकावरुन खळबळ, पालिका आणि पोलिसांनी तात्काळ फलक हटविला

डोंबिवली पूर्वेतील अयोध्या नगरीतील नगरसेवक कार्यालयाच्या मागे, जिजाईनगर शितला देवी मंदिराच्या मागे, सागर्लीतील बालाजी मंदिराच्या मागील भागात सुरू असलेल्या बेकायदा इमारतींना महावितरणकडून तात्पुरता वीज पुरवठा दिला गेला आहे. यामधील एक इमारत ६५ बेकायदा रेरा घोटाळ्यातील आहे. ज्या ठिकाणी तात्पुरते वीज मीटर आहेत, तेथील वीज पुरवठा कायम करण्यात आला आहे, अशी तक्रार निंबाळकर यांनी महावितरणच्या डोंबिवली विभागाकडे केली आहे. महावितरणच्या उपविभाग क्रमांक दोनच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यानी तिन्ही इमारतींना कायमस्वरुपी वीज पुरवठा दिला नाही असे निंबाळकर यांना कळविले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत आजदे गावात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

डोंबिवली पश्चिम, पूर्व, कल्याण पूर्व आडिवली ढोकळी, ई प्रभागातील २७ गाव हद्दीतील अनेक बेकायदा इमारतींमध्ये तात्पुरत्या वीज पुरवठ्याचा आधार घेऊन इमारतीला कायमस्वरुपी वीज पुरवठा करुन घेण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या आहेत. पालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे.

“कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना महावितरणकडून नियमबाह्य वीज पुरवठा दिला जात नाही. पालिकेने विभागवार ज्या बेकायदा इमारतींच्या याद्या दिल्या आहेत त्याची खात्री करुन अधिकृत इमारतींना वीज पुरवठा दिला जातो. कोणी नियमबाह्य वीज पुरवठा घेत असेल, अशी प्रकरणे निदर्शनास आली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”

-दीपक पाटील, अधीक्षक अभियंता महावितरण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power supply illegal buildings power connections fraud of home buyers and flat owners ysh
First published on: 24-01-2023 at 13:44 IST