ठाणे शहराच्या सांस्कृतिक विश्वात स्वत:चे वैशिष्टय़पूर्ण स्थान असणाऱ्या वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेचे २४वे अधिवेशन ११, १२ आणि १३ डिसेंबरदरम्यान समर्थ सेवक मंडळाच्या प्रांगणात भरणार आहे. आय. पी. एच. अर्थात इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेच्या विद्यमाने आयोजित वेध परिषदेचे यंदाचे सूत्र ‘बाह्य़रंग ते अंतरंग’ हे आहे. शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या बीजभाषणाने परिषदेला सुरुवात होईल. त्यानंतरच्या सत्रात संपूर्ण भारताची सायकल परिक्रमा करणाऱ्या आणि ‘वेध’पासून स्फूर्ती घेतलेल्या सचिन गावकर यांची प्रकट मुलाखत होईल. या वर्षीच्या वेधच्या खास पाहुण्यांमध्ये ‘बंधन बँक’ या नव्या खासगी बँकेचे संस्थापक चंद्रशेखर घोष यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे. बंधन ही लघू वित्तसंस्था बंगालमध्ये सुरू करण्यात आली असून ६८ लाख ग्रामीण जनतेचे भविष्य त्यातून बदलले. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने यावर्षी परवानगी दिलेल्या दोन खासगी बँकांपैकी बंधन एक आहे. वडिलांच्या मिठाईच्या दुकानात काम करणारा एक तरुण ‘बँकर’ कसा घडला ही कहाणी ‘वेध’चे खास आकर्षण आहे.
कल्याणजवळच्या पष्टेपाडा या वस्तीमधल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट करून भारतातील पहिली ‘टॅब शाळा’ निर्माण करणाऱ्या प्राथमिक शिक्षक संदीप गुंड यांचे दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी भरभरून कौतुक केले होते. या ‘डिजिटल साने गुरुजीं’ची कहाणी वेधच्या निमित्ताने आपल्यासमोर येणार आहे. संगीताचे बाह्य़रंग आणि अंतरंग प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर उलगडणार आहे. अभिनय कारकीर्दीचा प्रवास चतुरस्र अभिनेते संजय नार्वेकर सांगणार आहे. महाराष्ट्रातून आय. ए. एस. परीक्षेत पहिला आलेला तरुण अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, एलीफंट डिझाइनस् या देशातील अग्रगण्य डिझाइन कंपनीच्या संचालक अश्विनी देशपांडे, निसर्गविज्ञान क्षेत्रातील ‘ऑयकॉस’ ही कंपनी चालवणाऱ्या तरुण उद्योजिका केतकी घाटे आणि मानसी करंदीकरही यांचे सत्र होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून सर्पज्ञान पसरवणारा आणि सर्प उपचारांचा तज्ज्ञ समजला जाणारा चाळीसगावचा राजेश ठोमरे आणि वयाच्या नव्वदीमध्ये गिर्यारोहणाचा विक्रम करणारे फक्त ९७ वर्षांचे आबा महाजन उपस्थितांशी संवाद साधतील.
‘अर्थश्री’सारख्या वैशिष्टय़पूर्ण गृहनिर्माण प्रकल्पांचे जनक श्रीकांत परांजपे आणि वंचित बालगटाच्या विकासासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर वेधच्या निमित्ताने संवाद साधणार आहे. १३ सत्रांमधून मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, मानसशास्त्रज्ञ डॉ. दीपिका दाबके आणि पत्रकार रवींद्र मांजरेकर या साऱ्या खास माणसांबरोबर भेट घडवून आणणार आहेत.