ठाणे : मिरा-भाईंदर महापालिकेप्रमाणेच ठाणे महापालिकेकडे घोडबंदरचा रस्ता हस्तांतरण करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतेच बैठकीत दिले आहेत. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती वेळेत व्हावी याकरीता सरनाईक रस्ता हस्तांतरण प्रक्रियेसाठी आग्रही असले तरी, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मात्र यासाठी एक अट टाकली आहे. यामुळे घोडबंदर रस्ता हस्तांतरण वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि यामुळे कोंडीत वाढ होते. स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून या कोंडीवर उपाय काढण्याची मागणी सातत्याने होत आहे. हा मार्ग ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातून जात असले तरी तो सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि इतर विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीत येतो. निधी उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव प्राधिकरणांकडून रस्ते दुरुस्ती होत नाही. तशी खंत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत बोलून दाखविली होती. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येमुळे ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिकेला गेल्या काही वर्षांपासून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे गेले काही वर्षे महापालिकाच या मार्गावरील खड्डे भरणीची कामे करीत आहे. यातूनच हा रस्ता दोन्ही महापालिकांकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रस्तावानुसार गायमुख ते फाउंटनपर्यंतचा रस्ता मीरा-भाईंदर महापालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे, तर कापूरवाडी ते गायमुख हा रस्ता ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती. यात घोडबंदर मार्गावरील सर्व उड्डाणपुलावरील रस्त्याची डागडुजी, पुर्नपुष्ठीकरण एकाचवेळी हाती घेऊन पूर्ण केली जावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी बैठकीत दिले. त्याचबरोबर, गायमुख घाटाच्या पुर्नपुष्ठीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेस दिले होते. दरम्यान, खासदार नरेश म्हस्के यांनी घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासंबंधी घेतलेल्या बैठकीत रस्ता हस्तांतरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मात्र रस्ता हस्तांतरणाबाबत भुुमिका स्पष्ट केली. घोडबंडर रोड आणि इतर रस्त्याचा स्वीकार करण्यास महापालिका तयार आहे. मात्र, हस्तांतरणापूर्वी, सध्या या रस्त्याचा ताबा ज्या यंत्रणांकडे आहे, त्यांनी ते रस्ते सुस्थित आणून ठेवावेत. मगच महापालिका त्यांचा ताबा घेईल, अशी अट आयुक्त राव यांनी टाकली आहे.
