Thane Pod Taxi Project Updates : ठाणे : मुंबई महानगरातील सर्वच शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पाॅड टॅक्सीचा प्रस्ताव पुढे आला होता. घोडबंदर भागातील भाईंंदरपाडा ते विहंग हिल्स चौक पर्यंतच्या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर पाॅड टॅक्सी प्रकल्प उभारणीची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. खासगी लोकसहभाग (पीपीपी) तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने महापालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

या प्रकल्पाचे सादरीकरण गुरूवारी ठाणे महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी केले. परिवहनमंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रकल्पाबाबत भुमिका मांडल्याने प्रकल्पाचा आग्रह धरणाऱ्या कंपनीला अंकूश लागला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी आयुक्त सौरभ राव, पालिका अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी आणि पाॅड टॅक्सी प्रकल्प कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पाॅड टॅक्सी कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. सुमारे ५२ किमी लांबीचा मार्ग असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पात अंदाजे ६३ स्थानक असतील. तसेच पॉड टॅक्सीचा दर हा किफायतशीर असुन ३० रुपये प्रति माणसी प्रति टप्पा असेल. खासगी लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्यात भाईंदर पाडा ते कापुरबावडीपर्यंत ही सेवा सुरु करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींकडून बैठकीत सांगण्यात आले.

मंजुरीशिवाय प्रकल्प राबविणे शक्य नाही

पाॅड टॅक्सी प्रकल्पाच्या सादरीकरणानंतर आयुक्त सौरभ राव यांनी महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. या प्रकल्पाला पालिकेचा विरोध नाही. परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय मोठ्या खर्चाचा प्रकल्प पालिकेला राबविता येऊ शकणार नाही. केंद्र सरकारची मान्यतेनंतर हा प्रकल्प पालिका राबवू शकेल. सादरीकरणामध्ये प्रकल्प सुंदर दिसत असला तरी, प्रत्यक्षात तो कसा राबविला जाणार, हेही महत्वाचे आहे. तसेच पीपीपी तत्वावर राबविण्यात येणाऱ्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी मार्गदर्शक नियमावली असणे गरजेचे आहे. याशिवाय, हा प्रकल्प राबविणे कोणत्याही पालिकेला शक्य होणार नाही. राज्य सरकारची मित्रा संस्था आणि पीपीपी विभाग आहे. त्यांच्याशी संपर्क साधून आधी या सर्व बाबी पुर्ण करा. त्यानंतरच हा प्रकल्प राबविणे शक्य होईल, अशी भुमीका आयुक्त सौरभ राव यांनी घेतली. यानंतर केंद्र शासनस्तरावर प्रकल्पास मंजुरी घेण्याची प्रक्रीया सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. या प्रकल्पाची घोषणा करणारे मंत्री प्रताप सरनाईक यांनीही आयुक्त राव यांची री ओढल्याने प्रकल्पासाठी आग्रह धरणाऱ्या कंपनीला पालिका प्रशासनाचा अंकूश लागल्याचे चित्र दिसून आले.

मोनो रेल सारखी त्याची अवस्था होऊ नये

ठाणे शहरातील मेट्रो स्थानकांना पुरक ठरेल अशी पर्यावरण पूरक, स्वस्त आणि शास्वत भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था म्हणून पॉड टॅक्सी (उन्नत कार) प्रकल्पाचे लवकरच भूमीपुजन करण्याचा मानस मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. त्यापुर्वी या प्रकल्पाची प्रवासी वाहतूकीच्या सुरक्षिततेची कायदेशीर मान्यता, आर्थिक व्यवहार्यता तपासून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्प चांगला असला तरी, मोनो रेल सारखी त्याची अवस्था होऊ नये असे सांगत नागरिकांची सुरक्षितता महत्वाची असल्याचे स्पष्ट केले. तसेच आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे आवश्यक परवानगीशिवाय, हा प्रकल्प राबविणे शक्य नसून त्याची आधी पुर्तता करा, असेही ते म्हणाले.