Ghodbunder road : ठाणे : मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो; मात्र या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि संबंधित प्राधिकरणाऐवजी ठाणे व मीरा-भाईंदर महापालिकेला या दुरुस्तीची कामे करावी लागतात. यामुळेच हा रस्ता दोन्ही महापालिकांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेकडे रस्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ठाणे महापालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी दिले आहेत. मात्र, रस्ता स्वीकारण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एक अट घातली आहे.

घोडबंदर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यातच मेट्रो, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्याने कोंडीत भर पडत आहे. स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून या कोंडीवर उपाय काढण्याची मागणी सातत्याने होत आहे. मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के या दोन्ही नेत्यांनी आठवड्याभरात स्वतंत्र बैठका घेऊन घोडबंदरची कोंडी सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या मार्गावर अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहतूकीकरीता पिवळ्या मार्गिकेचा विचार ठाणे वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे.

हस्तांतरणाचा प्रस्ताव पुढे आला

घोडबंदर मार्ग ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतून जातो. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि इतर विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे कोणत्या प्राधिकरणाची नेमकी जबाबदारी आहे, हे स्पष्ट नसल्याने वार्षिक दुरुस्तीची प्रभावी कार्यवाही होताना दिसत नाही.

परिणामी, रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येमुळे ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिकेला गेल्या काही वर्षांपासून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर हा रस्ता दोन्ही महापालिकांकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रस्तावानुसार गायमुख ते फाउंटनपर्यंतचा रस्ता मीरा-भाईंदर महापालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे, तर कापूरवाडी ते गायमुख हा रस्ता ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मंत्री सरनाईकांचे निर्देश

घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाणपुलावरील रस्त्याची डागडुजी, पुर्नपुष्ठीकरण एकाचवेळी हाती घेऊन पूर्ण केले जावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले. त्याचबरोबर, गायमुख घाटाच्या पुर्नपुष्ठीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेस दिले.

आयुक्तांनी टाकली अट

घोडबंडर रोड आणि इतर रस्त्याचा स्वीकार करण्यास महापालिका तयार आहे. मात्र, हस्तांतरणापूर्वी, सध्या या रस्त्याचा ताबा ज्या यंत्रणांकडे आहे, त्यांनी ते रस्ते सुस्थित आणून ठेवावेत. मगच महापालिका त्यांचा ताबा घेईल, अशी अट आयुक्त सौरभ राव यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या बैठकीत बोलताना टाकली.