शहापूर : तालुक्यातील किन्हवली परिसरातील चाफ्याचीवाडी येथे रस्ता नसल्याने संगीता रवींद्र मुकणे या गर्भवती महिलेला पावसात चिखलातून वाट काढत सुमारे एक किमी अंतरावर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत डोलीतून नेण्याची वेळ आली. या दरम्यान तिला चक्कर आल्याने तिची प्रकृती खालावली होती. तिला प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर शहापूर उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने आवश्यक उपचार करून तिला ठाणे येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

शहापूर तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील चाफ्याचीवाडी येथील गर्भवती संगीता मुकणे (२१) हिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. तिला रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया तिच्या नातेवाईकांनी सुरु केली. तिच्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. मात्र, चाफ्याचीवाडी पासून रस्ता उपलब्ध नसल्याने पावसाने चिखल झालेल्या पाय-वाटेने वाट काढत सुमारे एक किमी अंतरापर्यंत डोलीतून न्यावे लागले. त्यापुढेही रुग्णवाहिकेसाठीचा रस्ताही चिखलाने व्यापलेला असल्याने चालकालाही कसरत करावी लागली. संगीता हिला टाकीपठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, त्यानंतर शहापूर उपजिल्हारुग्णालयात हलविण्यात आले. मात्र संगीता हिला आकडी आणि तोंडातून फेस येत असल्याने तिला तातडीने ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे आदिवासी संघटनेचे प्रकाश खोडका यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगीता मुकणे हिला चक्कर येत असल्याने आवश्यक उपचार करून ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.- अशिलाक शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हारुग्णालय.