कल्याणातील प्रवाशांची शेअर रिक्षाच्या जाचातून मुक्तता व्हावी आणि त्यांच्यापुढे मीटर रिक्षांचा पर्याय उभा राहावा यासाठी राज्य सरकारने अखेर पुढाकार घेतला असून ठाण्याच्या धर्तीवर येथेही प्रीपेड रिक्षा सुरू करण्याचा विचार उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जुना असला तरी त्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता हालचालींना वेग आला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने  प्रीपेड रिक्षेसाठी शहराच्या विविध भागांत रिक्षा प्रवासाचे किलोमीटर टप्पे ठरवण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे.
कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये मीटर रिक्षा धावत नाहीत. त्यामुळे शेअर रिक्षांशिवाय येथील प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसतो. या ठिकाणी मीटरनुसार भाडे आकारणी करणाऱ्या रिक्षा सुरू व्हाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत असली तरी येथील रिक्षा संघटना आणि प्रशासकीय यंत्रणा याविषयी फार आग्रही नाहीत, असे चित्र आहे. हे लक्षात घेऊन राज्याच्या परिवहन विभागाने उशिरा का होईना या दोन्ही शहरांमध्ये प्रीपेड रिक्षा सुरू करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आणला असून उपप्रादेशिक परिवहन विभागाने त्याविषयी सर्वेक्षणही हाती घेतले आहे.
कल्याण परिसरात प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करावी अशी मागणी रिक्षाचालक-मालक संघटनेने दोन वर्षांपूर्वी शासनाकडे केली आहे. शासनाने संघटनेची ही मागणी उचलून धरून तिला अखेर मंजुरी दिली आहे, असे रिक्षा संघटेनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले. प्रीपेड रिक्षाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकाऱ्यांनी शहरात सर्वेक्षण सुरू केला आहे, अशी माहिती प्रकाश पेणकर यांनी दिली.
प्रीपेडसाठी निश्चित भाडे
कल्याणमध्ये गोदरेज, बारावे, खडकपाडा, आंबिवली, सिनेमॅक्स, आधारवाडी, डोंबिवलीत लोढा, कासाबेला, एमआयडीसी, देशमुख होम्स, गोळवली आदी भागात प्रीपेड रिक्षेने जायचे असेल तर प्रवाशाला रेल्वे स्थानकाजवळील वाहनतळावर अंतिम स्थानका पर्यंतचा भाडे दर किती आहे हे सांगितले जाईल. या भाडे दरात प्रति किलोमीटर प्रमाणे १५ ते २० टक्के जादा भाडे तसेच ५ रुपये अधिकतम सेवेचा दर अशा सेवांचा समावेश असेल. वाहनतळावर प्रवाशाला भाडे दराची पावती दिली जाईल. ती पावती त्याने रिक्षा चालकाला दाखवली की, प्रवाशाचा प्रीपेड रिक्षेतून प्रवास सुरू होईल. यासाठी प्रवाशाला रिक्षाचालकाला भाडे देण्याचा प्रश्न येणार नाही. प्रवासी सोडून रिक्षाचालक वाहनतळावर आला की, त्याला तेथे त्याचे भाडे देण्यात येईल, अशी माहिती आरटीओतील अधिकाऱ्यांनी दिली. फक्त घरापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत येण्यासाठी प्रीपेड सेवेचा प्रवासी कसा लाभ घेतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या विषयी गुंतागुंत होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांना घ्यावी लागेल. रेल्वे स्थानकाकडून जाताना प्रवाशाला पावती मिळेल. घराकडून येताना प्रवाशाजवळ पावती नसेल. या प्रवासातले या बारीक बारकाव्यांवर उपाय शोधावे लागतील, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रक्रिया अशी असेल
* रेल्वे स्थानकापासून ते शहराच्या विविध भागांतील थांबे व टप्पे यांचे किमीतील अंतर निश्चित करण्यात येईल. त्यानुसार भाडेदर ठरवण्यात येईल.
* टप्पे व दर निश्चित झाल्यानंतर त्या पद्धतीचे सॉफ्टवेअर तयार करावे लागेल. कोणीही प्रवासी रिक्षा वाहनतळावर आला की, संगणकातील सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्या प्रवाशाचे प्रवासाचे अंतिम स्थान व तेथील भाडे दर संगणकावर कळू शकेल.
* रेल्वे अधिकाऱ्यांच्या सहमतीने कल्याण रेल्वे स्थानकाच्या लगतच प्रीपेड रिक्षांचा वाहनतळ सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाने संमती दर्शवली आहे.

सेवा यशस्वीपणे राबवू
कल्याण आरटीओ परिसरात प्रीपेड रिक्षा सेवा देण्यात कोणतीही अडचण नाही. यशस्वीपणे हा उपक्रम राबवण्यासाठी कल्याण आरटीओ विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. केवळ कल्याण नाही तर डोंबिवली व परिसरात अधिकाधिक प्रीपेड रिक्षा सेवेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.
– नंदकुमार नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण