महिलांकडून पारंपरिक लोकगीतांची आणि नृत्याची तयारी

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : बदलत्या काळाच्या ओघात वसईच्या ग्रामीण भागातील होळी सण साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीने आता हळूहळू कमी होऊ  लागल्या आहेत. मात्र पूर्वापार चालत आलेली परंपरा टिकली पाहिजे यासाठी जूचंद्र गावात होळी उत्सव साजरा करण्यासाठी महिला लोकगीते गाऊन फेर धरतात. सध्या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांनी पूर्वतयारी म्हणून सरावास सुरुवात केली आहे.

वसई तालुक्यातील जूचंद्र हे गाव आगरी लोकवस्ती असलेले गाव. हे गाव रांगोळी कलेसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तसेच हे गाव उत्साहात साजऱ्या केलेल्या पारंपरिक सणामुळे ओळखले जाते. त्यातील सर्वात मोठा सण म्हणजे होळी. स्थानिक आगरी  बोली भाषेत याला हावलाय किंवा हावळूबाय असे संबोधले जाते. अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. या सणाच्या पूर्वतयारीला जूचंद्र गावात सुरुवात झाली आहे. दररोज रात्री १० ते १२ या दरम्यान चौकात एकत्र जमून होळीची भक्तिमय लोकगीते सादर केली जाऊ  लागली आहेत.

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसापासून याची सुरुवात करण्यात आली असून मोठय़ा उत्साहात या महिला विविध प्रकारच्या पारंपरिक लोकगीतातून फेर धरून नाचून लोकजागर केला जात आहे. संध्याकाळची घरातील कामे पूर्ण झाली की सर्व महिला एकत्र येतात. एकसारख्या साडय़ा परिधान करून विविध प्रकारची होळीची व पारंपरिक लोकगीते ढोलकीच्या तालावर ठेका धरून नृत्य सादर करतात. अशी लोकगीते जोपर्यंत मोठी होळी लागत नाही, तोपर्यंत आम्ही सादर करतो, असे इंदुमती पाटील यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे विचारांची देवाणघेवाण होऊ  लागली आहे, असे पूजा म्हात्रे यांनी सांगितले.

अशी पारंपरिक गाणी गायली जातात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पारंपरिक गाणी स्वत:च बोलून त्यावर फेर धरून आणि एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवून गाणी गायली जातात. त्यामध्ये विशेषकरून ‘चांदण र चांदण पिठभर चांदण’, ‘गं ये मंगल वेढय़ात झाली वेशेला मुलगी’, ‘दिवा जळते दिवा जळते दिवा कशाने कोजलते’, ‘करिमाये करिमाये साखरेचं लाडू मला आयलेन भरतारु मूलु’, ‘ये दाराची शिरीग म्हणू ते दाराची बाल ग’, ‘किशोर आयलेन जेवायला हिंदू जेवण वार गं जेवीत जेवीत घाम सुटला इजनी वारा घाल गं’, ‘चिंचेवर बसला राघोराया चिंचा फोरी जाय’, ‘श्रावण बाळ जातो काशीला जातो काशीला’, ‘ये गं हावळूबाय माझे घरा पाहुनि’, ‘पुरण पोळीचा निवड दाविन तुला पिवळे साडीचा मान देईन तुला’, ‘करी ग वना मधी’, ‘कवळी काकडी गाईच्या लोण्यामध्ये अशा गीतांवर ठेका धरून मनमुराद आनंद लुटला जातो.