ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर काही महिन्यांतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदार, खासदारांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर ‘धर्मवीर दोन’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. नुकतेच या चित्रपटांचे निर्माते मंगेश देसाई यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

ठाण्यात शिवसेना पक्षाला मजबूत करण्याचे काम शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आनंद दिघे यांनी केले होते. दिघे यांच्या नेतृत्त्वात ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक निवडणूकांना शिवसेना सामोरे गेली होती. परंतु आनंद दिघे यांनी कधीही स्वत: निवडणूक लढविली नव्हती. टेंभीनाका या त्यांच्या आनंद मठात जनतेचा दरबार भरायचा.

ठाणे, पालघर सह विविध जिल्ह्यातून नागरिक त्यांच्या वैयक्तिक समस्या, तक्रारी घेऊन मठात यायचे. या समस्या सोडविण्यासाठी आनंद दिघे आणि त्यांचे शिवसैनिक सहकारी असत. आजही आनंद दिघे यांचे किस्से ठाण्यात चर्चिले जातात. त्यांच्या निधनानंतर काहीकाळ दिवंगत रघुनाथ मोरे यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्यातील शिवसेनेची जबाबदारी देण्यात आली.

धर्मवीर ते गुवाहाटी

धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट २०२२ मध्ये प्रसिद्ध झाला होता. हा चित्रपट आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित होता. चित्रपटासाठी शिवसेनेने सर्व सिनेमागृह बुक केले होते. आनंद दिघे यांच्या जीवनावरील या चित्रपटानंतर राज्यभरातून त्यांचे मठ पाहण्यासाठी, नवरात्रौत्सवात देवीची मूर्ती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करु लागले होते. या चित्रपटात आनंद दिघे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची व्यक्तीरेखाही दाखविण्यात आली होती.

त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांच्यासह काही आमदार, खासदार, माजी नगरसेवक, नेते, पदाधिकारी यांनीही उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ केला. ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीची साथ सोडावी अशी मागणी तेव्हा केली जात होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करत मुख्यमंत्रीपद मिळविले. त्यानंतर २०२४ मध्ये ‘धर्मवीर दोन’ हा चित्रपट देखील आला. यामध्ये एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांची भूमिका दाखविण्यात आली.

आता गुवाहाटी फाइल्स..

धर्मवीर दोन नंतर धर्मवीर तीन हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सर्वांना वाटत होते. परंतु त्याऐवजी ‘गुवाहाटी फाइल्स’ हा चित्रपटाची निर्मिती करु शकतो अशी शक्यता मंगेश देसाई यांनी एका माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले. तसेच हा चित्रपट केला तरी २०२७ किंवा २०२८ मध्ये करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या गुवाहाटी फाइल्स चित्रपटात काय असेल, हा प्रश्न चित्रपट चाहत्यांना पडला आहे.