विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे उद्दिष्टय़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी ठाणे जिल्ह्यातील सात प्रकल्पांची निवड झाली आहे. ‘श्वाश्वत जीवनासाठी विज्ञान’ हा यंदाच्या परिषदेचा मुख्य विषय होता. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. यंदा या परिषदेचे २९ वे वर्ष आहे. ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट ही संस्था संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या परिषदेची समन्वयक संस्था म्हणून गेली २० वर्ष कार्यरत आहे. मुलांच्या बाल वयात विज्ञानाची आवड जोपासली जावी, त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त व्हावा हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या माध्यमातून बाल वैज्ञानिक आपल्या नावीन्यपूर्ण पूर्ण कल्पना, संशोधन आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून प्रत्यक्षात साकरतात हे या परिषदेचे वैशिष्टय़ आहे, असे दिघे यांनी सांगितले.

राष्ट्रीय विज्ञान परिषदेची राज्यस्तरीय परिषद यंदा ८ आणि ९ जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने झाली. यंदाच्या बाल विज्ञान परिषदेत राज्यातील ३,५५९ प्रकल्प जिल्हा पातळीवर सादर झाले होते. त्यातील निवडक १०३ प्रकल्पांची राज्य स्तरीय अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. यापैकी ३० प्रकल्प राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवडण्यात आले आहेत. या ३० प्रकल्पांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सात, मुंबई उपनगर चार, मुंबई शहर एक, नाशिक तीन, रायगड तीन, पुणे दोन, धुळे दोन, अकोला एक, अैारंगाबाद एक, कोल्हापूर एक, नागपूर एक, नंदुरबार एक, सिंधुदुर्ग एक, सोलापूर एक, आणि यवतमाळमधील एका प्रकल्पाची निवड झाली आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत निवड झालेल्या बाल वैज्ञानिकांसाठी जिज्ञासा ट्रस्टतर्फे तज्ज्ञ व्यक्तींचे विशेष मार्गदर्शन शिबीर लवकर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती दिघे यांनी दिली.

निवड झालेले प्रकल्प

  • ठाण्यातील नौपाडा भागातील सरस्वती सेकंडरी शाळेतील दुचाकीस्वारांच्या सुरक्षितेसाठी जॅकेट डिझाइन आणि स्कीन अ‍ॅन्ड ईको फ्रेंडली डायपर या दोन प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. तन्मय महाजन, मानस भोसले, देवांशी गायकवाड आणि शुभ्रा चव्हाण या विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प तयार केले आहेत.
  • सुलोचना देवी सिंघानिया शाळेतील इनोव्हेशन ऑफ अ ससटेनेबल मास्क आणि ग्रीट अवर बायोडिग्रेडेबल पिल्स पॅकिंग या निवड करण्यात आली असून मिहीका सावंत, अदिती चौधरी, सुरवी लोखंडे आणि निधी मतवानी या विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प बनविले आहेत.
  • ए.के. जोशी विद्यालयातीलही मुखपट्टी पासून तयार करण्यात आलेल्या विटा आणि पुन्हा वापरता येणारे डिस्पेंसर या  प्रकल्पांची निवड झाली आहे. जय जोशी, रुचिर दामले, निलभ शेजवलकर आणि स्वराज चव्हाण यांनी या प्रकल्पांची निर्मिती केली आहे.
  • नवी मुंबई येथील विद्याभवन शाळेतील कापडवेष्टीत चष्मे हा निवड झालेला प्रकल्पा श्रृती कुलकर्णी आणि प्रिया कोपर्डे यांनी तयार केला.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Projects national child science conference ysh
First published on: 20-01-2022 at 00:02 IST