नवी मुंबई महापालिका तसेच अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांना जेमतेम पंधरवडा शिल्लक राहिल्याने पावलोपावली सावध भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने ठाणेकरांवरील पाणी तसेच मालमत्ता करवाढीचे प्रस्ताव किमान महिनाभर गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी पुढील पाच वर्षे कोणत्याही करात वाढ करणार नाही, असा शब्द तेथील मतदारांना दिला असून बदलापुरातही भाजपने मालमत्ता करात सवलतीचा राग आवळण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे विविध करांत वाढ करण्याचे प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने निवडणुका संपेपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
ठाणे महापालिकेच्या येत्या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प मांडताना जयस्वाल यांनी पाणी, मालमत्ता करात वाढ करण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवले.
डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर आता करवाढीशिवाय पर्याय नाही, असे जयस्वाल यांचे स्पष्ट मत आहे. जयस्वाल यांच्या या भूमिकेमुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपची मोठी कोंडी झाली असून गेल्या दोन महिन्यांपासून या प्रस्तावांवर चर्चा होऊ द्यायची नाही, अशी भूमिका या पक्षांचे पदाधिकारी घेताना दिसत आहेत.

नवी मुंबईचा धसका
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेच्या नेत्यांनी कमालीची प्रतिष्ठेची केली आहे. पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्याविरोधात आक्रमक प्रचार सुरू केला असून नवी मुंबईत सत्ता मिळविण्याच्या उद्देशाने भाजपसोबत युतीचा निर्णयही घेण्यात आला. गेली दहा वर्षे नवी मुंबईत सत्ताधारी राष्ट्रवादीने कोणतीही करवाढ केलेली नाही. यंदाच्या निवडणुकीत ही या पक्षासाठी जमेची बाजू आहे. असे असताना निवडणुकीपूर्वी ठाण्यातील करवाढीला मंजुरी दिली तर नवी मुंबईतील मतदारांत चुकीचा संदेश जाईल, अशी भीती सेना नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे किमान महिनाभर तरी हे प्रस्ताव गुंडाळून ठेवा, असे स्पष्ट आदेश महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. मे महिन्यात होणाऱ्या सभेत याविषयी निर्णय घेणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या राजकारणात किमान महिनाभर तरी ठाणेकरांवरील करवाढीचे संकट टळल्याचे चित्र  दिसत आहे. याप्रकरणी महापौर संजय मोरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.
जयेश सामंत, ठाणे</strong>