राजकीय गुन्हे करणारे तडीपार;मात्र खुनाचे आरोपी मोकाट, आनंद परांजपे यांचा पोलीस आयुक्तांना प्रश्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आजू-बाजूला; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आणि मुख्यमंत्र्यांच्या मंचावरच जन्मठेप झालेले गुंड दिसत असतात. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरणारे नामचीन गुंड पोलिस आयुक्तांना दिसत नाहीत का?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहारध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.

ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशंत गायकवाड यांनी मारहाण केली होती. या मारहाणी प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. असे असताना ठाणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात तडीपारीच्या कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. सोमवारी ठाणे पोलिसांनी चौघांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. तुम्हाला ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार का केले जाऊ नये असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसे त्यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी चारहीजण साहाय्यक पोलीस आयुक्त एस. पी. ढोले यांच्यासमोर हजर झाले. नोटीस उशीराने मिळाल्याने चौघांनी उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती. परंतु ढोले यांनी त्यांना एका आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले. राष्ट्रवादीने या कारवाईवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा एककलमी कार्यक्रम ठाणे पोलिसांचा सुरु आहे. त्या विरोधात आमचा न्यायालयीन लढा सुरुच आहे. मात्र, मागील काही महिन्यात जामीन देताना न्यायालयाने ठाणे पोलिसांच्या बाबतीत जी निरीक्षणे नोंदविली आहेत. त्याकडे पाहता, ठाणे पोलिसांनी न्यायालयाच्या निरीक्षणांमधून धडा घेतलेला नसल्याचेच दिसून येत आहे. असा आरोप आनंद परांजपे यांनी केला.

तसेच ठाणे पोलीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी लष्कर असल्यासारखे काम करीत आहे. तडीपारीची नोटीस कार्यकर्त्यांनी स्विकारुन न्यायालयीन लढाईस सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री जेव्हा ठाण्यात येतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूला असलेले अनेक नामचीन गुंड ठाणे पोलिसांना दिसत नाहीत का? त्यातील अनेक गुंडांना हत्येसारख्या गुन्ह्यात जन्मठेप झालेली असून अपिलात गेल्यामुळे सध्या ते जामीनावर मुक्त आहेत. एकाने तर कब्बडी स्पर्धा आयोजित केली होती. हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला एमपीडीए लागलेला गुंड जात असतो. एमसीएच्या बैठकीत कोण गुंड असतात? मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनेक नामचीन गुंड वावरताना दिसत असतात. मुख्यमंत्र्यांच्या सोबत मंचावरही दिसतात. त्यामुळे ठाणेकर म्हणून आपणाला अनेकदा लाज वाटते की, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना पोलीस अधिकारी सलामी ठोकतात; त्यावेळी फ्रेममध्ये नामचीन गुंड दिसून येतात.याच्यावर ठाणे पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत. असाही गंभीर आरोप त्यांनी केला.

आमच्या कार्यकर्त्यांवर राजकीय आंदोलनातील गुन्हे आहेत. तरीही, त्यांना तडीपार केले जात आहे. पण, नामचीन गुंडांकडे तिरक्या नजरेने बघायची देखील हिम्मत ठाणे पोलीस दाखवित नाहीत. हे ठाणे शहराचे दुर्भाग्य आहे. नुकतेच जांभळी नाका येथे शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला. ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. त्याकडे बघायला ठाणे पोलिसांना वेळ नाही. पण, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला वेळ आहे, अशी टीकाही आनंद परांजपे यांनी केली. शिवसेनेचे विजय साळवी आणि एम. के मढवी यांच्यावरही अशीच तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. त्यामुळे आता आपण पुन्हा सांगतो की, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग हे जनरल डायरसारखे वागत आहेत. त्यामुळेच पोलिसांनी असा त्रास देण्याऐवजी आम्हाला साकेत मैदानात बोलावून आमच्यावर एके ४७ ने गोळ्या झाडाव्यात, असेही परांजपे म्हणाले.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prosecution of political crimes but anand paranjpe who is accused of murder is missing and asked the police commissioner amy
First published on: 13-03-2023 at 22:52 IST