स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रचलित असलेल्या नाटय़संगीत परंपरेला भावसंगीताची जोड देऊन ते अधिक लोकप्रिय करण्यात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे मोठे योगदान आहे. ‘कटय़ार काळजात घुसली’ या सिनेमामुळे त्या स्वर्गीय सुरांची अनुभूती पुन्हा एकदा प्रत्ययास आली. नव्या पिढीलाही या सुरांनी वेड लावले. अभिषेकीबुवांचे गाणे हे महाराष्ट्रीय संगीत परंपरेतील एक अवीट असे स्वरमंडल आहे. या महान गायक-संगीतकाराची आठवण म्हणून ठाण्यातील रघुनाथ फडके हे त्यांचे एक शिष्य गेली १४ वर्षे उत्कर्ष मंडळाच्या सहकार्याने गुरूवर्य पं. जितेंद्र अभिषेकी स्मृतिवंदना आयोजित करतात. यंदा हा सोहळा येत्या शनिवारी २६ मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी, नौपाडा, ठाणे (प) येथे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रीय संगीत परंपरेत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे फार मोठे योगदान आहे. पारंपरिक नाटय़संगीताला भावसंगीताची डूब देऊन एकापेक्षा एक अवीट चालीची गाणी त्यांनी दिली. त्याचबरोबर पारंपारिक गुरूकुल पद्धतीने संगीताचे शिक्षण देऊन नवे शिष्यही घडविले. त्यांच्या तालमीत अनेक उत्तम गायक, संगीतकार घडले. ठाण्यातील रघुनाथ फडके त्यापैकी एक. मूळ गोवेकर असलेल्या रघुनाथ फडकेंना त्यांच्या घरातूनच संगीताचा वारसा मिळाला होता. त्यांचे वडील गजाननबुवा फडके कीर्तनकार होते. काका विष्णूबुवा फडके उत्तम हार्मोनियमपटू होते. त्यामुळे संगीताचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. पुढे रत्नकांत रामनाथकर यांच्याकडे आग्रा घराण्याच्या संगीताचे शिक्षण त्यांना मिळाले. साहजिकच वाणिज्य शाखेचे पदवी शिक्षण घेऊनही रघुनाथ फडकेंचा ओढा संगीत क्षेत्राकडेच अधिक होता. १९८० मध्ये गोवा कला अकादमीची शिष्यवृत्ती मिळवून ते मुंबईत आले. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या घरी राहून तब्बल दहा वर्षे संगीत शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे १९९१ मध्ये ते आकाशवाणी मुंबई केंद्रात कलावंत म्हणून नोकरी करू लागले. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर अभिषेकीबुवांची आठवण म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठाण्यात एखादी सांगीतिक मैफल आयोजित करावी, अशी कल्पना आकाशवाणीतील त्यांचे एक मित्र दिनेश आडावदकर यांनी मांडली. रघुनाथ फडके यांनी ही कल्पना उचलून धरली आणि २००२ पासून दरवर्षी ठाण्यात पं. जितेंद्र अभिषेकी स्मृतिवंदना सोहळा सुरू झाला. शहरात त्यापूर्वीपासूनच पं. राम मराठे स्मृती संगीत महोत्सव, गोपीकृष्ण महोत्सव आदी संगीत मैफली होत आहेत. त्यात आणखी एका दर्जेदार उपक्रमाची भर पडली.
दशकभराहून अधिक काळ हा उपक्रम नियमितपणे सुरू असून त्याला रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. फैय्याज, रामदास कामत, बकुळ पंडित, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, आशा खाडिलकर, अर्चना कान्हेरे, रघुनंदन पणशीकर, मुग्धा वैशंपायन आदी अनेक दिग्गज गायकांनी या मैफलींमध्ये आपली कला सादर केली आहे.
‘मत्स्यगंधा’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘गोरा कुंभार’, ‘मीरामधुरा’, ‘कटय़ार काळजात घुसली’ या अभिषेकीबुवांनी संगीत दिलेल्या नाटकांमधील अनेक अजरामर गाणी या महोत्सवांमधून ऐकायला मिळत असल्याने श्रोते दरवर्षी आवर्जून मोठय़ा संख्येने हजेरी लावत असतात. ‘अबीर गुलाल’, ‘काटा रुते कुणाला’, ‘घेई छंद’, ‘सुरत पियाँ की’, ‘कैवल्याच्या चांदण्याला’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘प्रेम वरदान’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘या भवनातील गीत पुराणे’ अशा एका एकापेक्षा एक गाण्यांचे सादरीकरण महोत्सवात होते. त्याचबरोबर त्या सुवर्ण काळातील इतर सदाबहार रचनांनाही सादर होतात. एका शिष्याने गुरूप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते. मात्र अभिषेकीबुवांचे परिचित आणि संगीत रसिकांच्या मदतीमुळेच हा महोत्सव मी गेली १४ वर्षे करू शकलो, असे रघुनाथ फडके नम्रपणे नमूद करतात. यंदा या महोत्सवात वीणा सावले, प्रचला आमोणकर, हृषिकेश बडवे, हृषिकेश बोडस आणि रघुनाथ फडके हे गायक कलावंत सहभागी होणार आहेत. त्यांना मकरंद कुंडले (ऑर्गन), जयंत फडके (हार्मोनियम), साई बँकर, किशोर तेलवणे (तबला), राजेंद्र भावे (व्हायोलिन), गुरुनाथ घरत (पखवाज), राजन पित्रे (तालवाद्य) हे साथ करणार आहेत. दिनेश आडावदकर, ऋतुजा फडके आणि दीपाली केळकर सूत्रसंचालन करणार आहेत. आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद अस्लम खान कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पं. डॉ. विद्याधर व्यास यांचा सत्कार केला जाणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pt jitendra abhisheki big contribution in maharashtrian music tradition
First published on: 23-03-2016 at 03:10 IST