ठाणे : मुंबई महापालिकेच्या जकात कर विभागातील उपकर निर्धारक व संकलक सुनील बने याला ठाणे न्यायालयाने चार वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नऊ वर्षांपूर्वी सुनील बने याला एका व्यवसायिकाकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे.

जून २०१४ मध्ये जकात कर चुकविल्याप्रकरणी एका व्यवसायिकाकडे सुनील बने याने तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे लाचलुचपत विभागाचे तत्त्कालीन पोलीस निरीक्षक अरुणकुमार सपकाळ यांच्या पथकाने सापळा रचून बने याला लाच घेताना पकडले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते काही वर्षांपासून जामिनावर सुटले होते. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणाचा तपास पूर्ण करून ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्याकडे दोषारोपपत्र सादर केले.

हेही वाचा – मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने निमंत्रितांचे कवी संमेलन, ठाणे महापालिकेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

हेही वाचा – ठाणे : उर्जादायी असलेल्या तृणधान्याचे आहारात प्रमाण वाढवा, डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमित शेटे यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती सबळ पुराव्यानिशी आरोप सिद्ध झाल्याने बने याला न्यायालयाने चार वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुषमा पाटील यांनी केला असून, सरकारी अभियोक्ता संजय मोरे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून उपाधिक्षक अश्विनी पाटील, हवालदार एस.आर. शहा, पोलीस नाईक पारधी यांनी काम पाहिले.