पुरणपोळीच्या किमतीत चार ते पाच रुपयांनी वाढ; विक्रीवर मात्र कोणताही परिणाम नाही
होळी म्हटली की तुपाच्या धारेसोबत गरम पुरणपोळीची आठवण येते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतोच. आजही गृहिणी पुरणपोळ्या बनवीत असल्या तरी घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी पेलणाऱ्या कारभारणी आता घरात पुरणपोळ्या करण्याऐवजी ‘रेडिमेड’ आणण्यास पसंती देतात. मात्र यंदाच्या पुरपोळीला महागाईचा ‘रंग’ आहे. कारण पुरणपोळी गेल्या वर्षीपेक्षा चार ते पाच रुपयांनी महागली आहे. मात्र तरीही विक्रीवर कोणताही अनिष्ट परिणाम झालेला नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले.
पूर्वी होळीची चाहूल लागल्यावर घरोघरी पुरणाचे साचे घासूनपुसून ठेवले जात. मात्र आता काळ बदलल्याने रेडिमेड पुरणपोळी बनविण्यांकडे ऑर्डर देण्यासाठी नोकरदार महिलांची लगबग दिसते. सर्वच क्षेत्रांत महागाई वाढल्यामुळे पुरणपोळीही काहीशी फुगली आहे. यंदा पुरणपोळीची किंमत पाच रुपयांनी वाढली आहे, तरीही मागणीवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. गेल्या वर्षी १५ रुपयांना मिळणारी पुरणपोळी आज २० रुपयांवर तर छोटय़ा आकाराच्या पुरणपोळ्या १० रुपयांनी विकल्या जात असल्याचे नायगाव येथील पुरणपोळी विक्रेत्या कोमल सातार्डेकर यांनी सांगितले. मराठी घरांत होळीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. त्याचप्रमाणे अनेक बिगरमराठी लोकही होळीच्या दिवशी पुरणपोळीचा आस्वाद घेतात. त्यामुळे मागणीत वाढ होत असल्याचे कोमल यांनी सांगितले. अधिक टिकाऊ असलेल्या तेलपोळ्याही होळीनिमित्त हातोहात विकल्या जातात. मात्र महागाईमुळे या वर्षी खवय्यांना एका तेलपोळीसाठी ४० रुपये मोजावे लागत आहेत.
महागाईचे कारण
वसईतील पोळीभाजी केंद्रात, मिठाईच्या दुकानातूनही पुरणपोळ्यांची मोठय़ा प्रमाणावर विक्री होत असते. महागाई झाली तरी यंदा ३० ते ४५ हजार पुरणपोळ्यांची विक्री होईल, असा अंदाच विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. पुरणपोळ्यांच्या किमतीत पाच रुपयांनी वाढ झाल्याची कारणे सांगताना कोमल सातार्डेकर यांनी सांगितले, की पुरणपोळ्या तयार करणाऱ्या महिला दिवसावर काम करतात.
आतापर्यंत १०० रुपये दिवसाला या महिला घेत होत्या. मात्र आता त्या दररोज पुरणपोळ्या बनविण्यासाठी १५० रुपये घेतात. यामुळे दरवाढ करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. सणासुदीला घरात गोडधोड पदार्थ बनविण्याची पद्धत हळूहळू कमी होत असून विकत मिळणाऱ्या घरगुती पद्धतीच्या पदार्थाकडे गृहिणींचा कल वाढला आहे.