घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलांच्या निर्माणानंतर मागील अनेक वर्षांपासून येथे कायमस्वरूपी धोका दर्शविणारे घटक नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत होते. अखेर उशीराने जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने धोका दर्शविणारे घटक बसविण्यास सुरूवात केली आहे. घटकांअभावी घोडबंदर मार्गावर अपघातसत्र सुरू होते. त्याचा परिणाम शहरातील वाहतुक व्यवस्थेवर बसत होता.
हेही वाचा >>> कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या निषेधाचे फलक; फलकांमधून महेश गायकवाड यांचे समर्थन
घोडबंदर मार्गावरून दिवासाला हजारो वाहने वाहतुक करतात. तसेच उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या अवजड वाहनांची वाहतुक देखील या मार्गावरून आहे. घोडबंदर परिसरात मागील १० ते १५ वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या वाहनांचा भार देखील या मार्गावर असतो. या मार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ भागात एकूण तीन उड्डाणपुल निर्माण करण्यात आले आहेत. उड्डाणपुलांच्या देखभाल दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात. नियमानुसार, उड्डाणपुलांच्या पायथ्याशी परावर्तक, वाहनांची गती नियंत्रणात ठेवण्यासाठी धोका घटक बसविणे आवश्यक होते. परंतु येथे धोका घटक बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे या उड्डाणपुलांच्या पायथ्याशी भरधाव वाहनांचा अपघात होऊन वाहने रस्त्यावर उलटत होती. सर्वाधिक अपघात ट्रक, टेम्पो या वाहनांचे होत होते. अनेकदा अपघातामुळे मालवाहू ट्रक, टेम्पोमधील साहित्य रस्त्यावर पडून साहित्याचे नुकसान होत होते. त्यामुळे ट्रक चालकासह ट्रकमध्ये असलेल्या साहित्याचे मालकांना देखील आर्थिक नुकसान सहन करावे लागत.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या फलकांवरून यापुढे शिवसेना नेते, पदाधिकारी बाद? भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा निर्णय
वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांच्या वाहतुक नियंत्रण विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार सुरू होता. तसेच सुरक्षा घटक बसविण्याची विनंती केली होती. असे असतानाही कोणतीही उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात नव्हती. दरम्यान, या संदर्भाचे वृत्त ४ जानेवारीला ‘धोक्याचे इशारे गायब’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता ठाणे’ या सह दैनिकात प्रकाशित झाले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने बसविण्यास सुरूवात केली आहे. येथील तिन्ही उड्डाणपुलांच्या दोन्ही दिशेला धोका घटक बसविण्यात आले आहे. येथे परावर्तक, लोखंडी अडथळे बसविण्यात आल्याने रात्रीच्या वेळेत प्रवास करताना वाहनांचा वेग कमी होऊ लागला आहे. तसेच अपघात टळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
पूर्वी उड्डाणपुलांच्या पायथ्याशी धोका इशारे नसल्याने घोडबंदर मार्गावर येणाऱ्या ट्रक चालकांचे अपघात होत होते. आता धोका इशारे बसविण्यात आल्याने रात्रीच्या वेळेत वाहनांची गती कमी होत आहे. – रोशन भोईर, वाहन चालक.