विरार येथील ‘हॉटेल आर जे’ हे खास कबाबसाठी प्रसिद्ध असलेले रेस्टॉरंट आहे. येथील हसीना कबाब हा लाजवाब पदार्थ चाखण्यासाठी फक्त विरारमधूनच नव्हे तर मुंबईचे कबाब शौकीनही या ठिकाणी हजेरी लावतात. वेगवेगळे पदार्थ, त्यातही खास कबाबमध्ये नवीन प्रयोग करत हसीना कबाब तयार करण्यात आले आहे..

कबाब म्हणजे खास मांसाहारी पदार्थाची आवड असणाऱ्यांसाठी जीव की प्राण. त्यात कबाबचे वेगवेगळे प्रकार मिळत असतील तर खवय्यांची पावले तेथे वळलीच म्हणून समजा. अशा खवय्यांना काही तरी वेगळा पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून विरार येथील संदेश शेट्टी यांनी ‘हॉटेल आर जे’ हे कबाबसाठी खास प्रसिद्ध असणारे रेस्टॉरंट सुरू केले. येथील हसीना कबाब हा लाजवाब पदार्थ चाखण्यासाठी फक्त विरारमधूनच नव्हे तर मुंबईचे कबाब शौकीनही या ठिकाणी आपली हजेरी लावतात.

वेगवेगळे पदार्थ, त्यातही खास कबाबमध्ये नवीन प्रयोग करत संदेश यांनी हसीना कबाबचा शोध लावला आणि हा प्रकार खवय्यांच्या पसंतीसही उतरला. फक्त ‘हॉटेल आर जे’च्या मेनूमध्ये सापडणारे हे हसीना कबाब बनवण्याची पद्धतही मजेदार आहे. कोंबडीची कलेजी व कोंबडीचा तिठा यांचा खिमा बनवून ते चिकनमध्ये स्टफ करून चिकनचा रोल बनवायचा. त्यानंतर चीज, दही आणि इतर मसाल्याच्या पदार्थाचे मिश्रण एकत्र करून ते चिकन रोलला लावायचे. नंतर ते तंदूरमध्ये टाकून रोस्ट केल्यावर हसीना कबाब तयार होतो. फारशी पूर्वतयारी करायला न लागणारा आणि झटपट तयार होणारा हा पदार्थ स्टार्टर म्हणून उत्तम आहे.

हसीना कबाबसह येथे इतरही नवीन पदार्थ चाखायला मिळतील. ‘स्टीम पापलेट’ म्हणजे वाफेवर शिजवले जाणारे पापलेट ही आगळीवेगळी डिश तुम्हाला येथे चाखायला मिळेल. जे खवय्ये मासे आवडत असूनही फक्त तेलकटपणामुळे तळलेला मासा खाणे टाळतात त्यांना हे वाफेवर शिजवलेले पापलेट नक्कीच आवडेल. या प्रकारात पापलेटमध्ये नारळाची ग्रीन चटणी स्टफ केली जाते आणि केळ्याच्या पानात बांधून ते शिजवले जाते, जेणेकरून त्या पापलेटला त्या केळीच्या पानाचा स्वाद आणि चटणीचा स्वाद मिळतो. शिजवल्यानंतर या पापलेटला नैसर्गिक हिरवा रंग प्राप्त होतो. त्यामुळे हे पापलेट खाण्याची मजा काही औरच असते.

त्यानंतर इकडची आणखी एक खासियत म्हणजे स्लरिस्टिक सूप. हे सूप सर्व भाज्यांच्या मिश्रणातून बनवले जाते. हेल्दी म्हणून जास्त खवय्ये हे सूप पिण्यासाठी या रेस्टॉरंटला भेट देतात. हे सूप व्हेज आणि नॉनव्हेजमध्येदेखील उपलब्ध आहे. चायनीज फूड, सूप, निरनिराळे सँडविचेस, चिकन तंदुरीचे प्रकार, स्पेशल चिकन डिश, मासे, साऊथ इंडियन डिश, तर आर जे स्पेशल डिश अशा विविधांगी मेनूने त्यांचे मेनुकार्ड सजलेले आहे. खवय्यांना चविष्ट आणि गरमागरम देण्याचा आमचा प्रयत्न असतो. विशेषत: शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ शिजविताना हा पंक्तिभेद कटाक्षाने पाळला जातो. त्यामुळे खवय्ये निश्चिंत मनाने आमच्याकडचे पदार्थ घेऊन जातात, असे शेट्टी सांगतात. त्यामुळे ज्यांना आर जे स्पेशल पद्धतीचं जेवण चाखायचं आहे त्यांच्यासाठी हे हॉटेल पर्वणीच ठरणार आहे. येथे कोणताही पदार्थ तयार करून ठेवला जात नाही. मागणी येईल त्याप्रमाणे पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे तुम्हाला नेहमी गरमागरम पदार्थच मिळतात. पदार्थाची चव टिकवण्यासाठी चिकन, मटण, मासे यांची साठवण न करता आवश्यकतेनुसारच बाजारहाट केली जाते.

  • पत्ता : ‘हॉटेल आर जे’, फुलपाडा रोड, आर जे नगर, विरार ईस्ट.
  • वेळ : सकाळी ११ ते रात्री ११.३० पर्यंत सुरू राहते.