ठाणे: भारत जोडो यात्रेनिमित्ताने या आठवड्याच्या अखेरीस ठाणे जिल्ह्यात येणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यात्रा या भागातील नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघातून वळवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची फारशी ताकद उरलेली नाही. संघटनात्मक पातळीवर भिवंडीतील ठराविक मतदार संघापुरते उरलेल्या काँग्रेसने राहुल गांधींची यात्रेचा मुक्काम याच भागात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मात्र भिवंडी वरून निघणारी यात्रा कारेगाव टोल नाक्यावरून थेट मुंब्र्याच्या दिशेने जाणार आहे. मुब्रा येथून कळव्यात आणि पुढे ठाण्यातील जांभळी नाका येथे यात्रा येईल. काँग्रेसची जिल्ह्यातील तोळा मासा अवस्था पाहता जितेंद्र आव्हाडांनीच या यात्रेचा बराचसा भार आपल्या खांद्यावर घेतल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळेच या यात्रेचा मार्ग हा त्यांच्या कळवा मुंब्र्यातून जाणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. ही न्याय यात्रा राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातून ठाणे शहरात जाणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांसोबत जितेंद्र आव्हाड हे देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे आव्हाड यांच्यासाठी भिवंडीतून कळवा-मुंब्रा मतदार संघात यात्रा वळविल्याची चर्चा रंगू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कळवा- मुंब्रा मतदार संघात आमदार जितेंद्र आव्हाड निवडून येत आहेत. परंतु राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याने आव्हाड यांचे एकेकाळचे सहकारी माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक नजीब मुल्ला तसेच कळवा, मुंब्रा भागातील काही पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. आव्हाड यांच्या मतदार संघात अजित पवार गटाने मतांची पेरणी करण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, येत्या १५ मार्चला राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे जिल्ह्यात येणार आहे. या निमित्ताने आता कळवा- मुंब्रा मतदारसंघातून ही यात्रा ठाण्यात येणार आहे. खारेगाव येथून मुंब्रा बायपास मार्गे या कौसा येथून यात्रेला सुरूवात होईल. राहुल गांधी मुंब्रा शहरातील नागरिकांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी हे कळवा येथील छत्रपती शिवाजी महारांच्या स्मारक आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर ही यात्रा ठाणे शहरात प्रवेश करेल. येथील जांभळीनाका भागात राहुल गांधी संबोधित करणार आहे. आव्हाड हे देखील यात्रेत सहभागी असणार आहेत. त्यामुळे ही यात्रा कळवा-मुंब्रा मतदारसंघातून वळविण्यात येणार आल्याचे बोलले जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi bharat jodo yatra will pass through jitendra awad kalwa mumbra area amy
First published on: 12-03-2024 at 19:57 IST