पश्चिम, हार्बरवरील उन्नत मार्गापलीकडे एकही घोषणा नाही; सीएसटी-ठाणे मुख्य मार्गाकडे दुर्लक्ष
उपनगरी रेल्वेच्या जादा फेऱ्या, कल्याण-कर्जत शटल फेऱ्या, कल्याण-वाशी लोकलसेवा अशा असंख्य अपेक्षांनिशी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकर प्रवाशांच्या पदरी रेल्वे अर्थसंकल्पाने अखेर निराशा पडली. चर्चगेट ते विरार आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल दरम्यानच्या उन्नत मार्गाची उभारणी आणि हार्बर मार्गावरील उन्नत मार्ग मुंबईतील मेट्रोशी एकीकृत करण्याच्या घोषणेपलीकडे प्रभू यांनी मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवेसाठी एकही आश्वासन दिले नाही. मुंबई उपनगरीय रेल्वेसेवेतील सर्वाधिक गर्दीचा मार्ग असलेल्या सीएसटी-कल्याण या मध्य रेल्वेच्या मार्गावरील प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाची ठरणारी एकही घोषणा केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही. एकीकडे तिकीट दरांत वाढ न करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करतानाच प्रवासी सुविधांच्या पातळीवर हा अर्थसंकल्प ‘व्यर्थसंकल्प’ असल्याची टीका प्रवासी संघटना व तज्ज्ञांनी केली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी गुरूवारी रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर केला. मुंबईच्या सर्वाधिक गर्दीचा भाग असलेल्या मध्य रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या रेल्वे अर्थसंकल्पाकडून नव्या फेऱ्या, नवे रेल्वे रूळ, शटल सेवा, नवे टर्मिनस अशा अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. शिवाय दिव्यामध्ये झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे मंत्री या भागासाठी सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. रेल्वे मंत्र्यांच्या संपुर्ण भाषणामध्ये या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी केवळ सहानुभूती शिवाय कोणताच उल्लेख करण्यात आलेला नाही. याउलट ‘वाढत्या गर्दीवर तोडगा म्हणून राज्य सरकारांनी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करता येईल का, हे पाहावे,’ असा सल्ला प्रभू यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिला. चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल या उन्नत मार्गाची घोषणा त्यांनी केली. मात्र गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या या मार्गाना केंद्र सरकारच्या ‘निती’ आयोगाने काही महिन्यांपूर्वीच मान्यता दिली असल्याने त्यात नवीन काही नाही, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. सीएसटी-ठाणे हा सर्वात महत्वाचा मार्ग असून त्यावर मोठय़ा प्रमाणात ताण येत असल्याने हा मार्ग उन्नत करण्याची खरी गरज आहे. एमयुटीपी तीनच्या कामांमध्ये महत्वाच्या मार्गाना मान्यता सुध्दा मिळालेली नाही, असा आक्षेप घेतला जात आहे.
टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर जसई-उरण या १० किमीच्या मार्गासाठी १९ कोटी रुपये देण्यात आले आहे. मात्र कल्याण-कर्जतदरम्यान शटल सेवा सुरू करण्याची तसेच कल्याण-वाशीदरम्यान ‘ट्रान्सहार्बर’ वाहतूक सुरू करण्याबाबतही रेल्वे अर्थसंकल्पात कोणताही उल्लेख नाही.

प्रवाशांचा अपेक्षाभंग
’ रेल्वे मानकानुसार प्रत्येक स्थानकावर २ स्वच्छतागृहे व २ शौचालये असणे बंधनकारक आहे. त्यातही रेल्वे स्थानकांवर स्वच्छतागृहांची कमतरता असूनही कोणतीही तरतूद करण्यात आली नाही.
’ लोकलमधून पडून वर्षभरात सुमारे ७०० जणांचा मृत्यू झाला. यामुळे हे अपघात रोखण्यासाठी अधिक गाडय़ा सुरू करण्याची तसेच संबंधित उपाययोजना करण्याची अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही.
’ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि अत्याधुनिक उपाययोजना करणे अपेक्षित होते. वर्षभरात रेल्वेच्या हद्दीत होणाऱ्या गुन्ह्य़ांचे प्रमाण सुमारे दीड हजारांवर आहे.

गर्दीची स्थानके..
उपनगरीय रेल्वे सेवेच्या अखत्यारित येणाऱ्या ८५ स्थानकांमध्ये सर्वाधिक गर्दीचे डोंबिवली हे स्थानक असून तिथे दररोज २ लाख ३३ हजार ६३५ प्रवासी प्रवास करतात. रेल्वेच्या गर्दीच्या पहिल्या पाच स्थानकांमध्ये डोंबिवली, ठाणे, कल्याण, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांचा समावेश आहे. ठाण्यातून २ लाख २५ हजार ४९०, कल्याण १ लाख ८० हजार ६७६, घाटकोपर १ लाख ७४ हजार ९२६ आणि कुर्ला येथून १ लाख ५० हजार ७०८ अशी प्रवासी संख्या आहे.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या एकुण भाषणामध्ये मध्य रेल्वेसाठी कोणतीच भरघोस तरतूद केलेली दिसत नाही. भविष्यातील नवी मुंबई विमानतळ डोळ्यासमोर सीएसटी-पनवेल या हार्बर मार्गाचा विकास केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, मध्य रेल्वेकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे हेच खरे.
– आनंद परांजपे, माजी खासदार

ठाणे-कल्याणकरांचा अपेक्षाभंग
नवी मुंबईमध्ये होणाऱ्या नव्या विमानतळाच्या दृष्टीकोनातून सीएसटी-नवीमुंबई उन्नत रेल्वे मार्गाची घोषणा केली आहे. हे भविष्यातील विकासकामांकडे लक्ष देत असताना आजच्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतीच तरतुद या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही. उपनगरीय रेल्वे मार्गावर फेऱ्या वाढवणे येवढे सुध्दा या रेल्वे अर्थसंकल्पातून झालेले नाही. जुन्या गाडय़ा, जुनी सिग्नल यंत्रणा आजही कायम असून त्याचा फटका प्रवाशांना नेहमीच बसतो. हे सुधारावे इतकीच इच्छा होती मात्र या रेल्वे अर्थसंकल्पात त्याचा कोणताच समावेश झाले असे म्हणता येणार नाही.
– राजन विचारे, खासदार

मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या कोणत्याच गोष्टीचा समावेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या भाषणामध्ये झालेला दिसून येत नाही. कल्याण-ऐरोली रेल्वे मार्गाला चालना, कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत चौथी मार्गीका अशा कोणत्याच गोष्टी या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नाही. मध्य रेल्वेची अवश्यकता लक्षात घेऊन सीएसटी-ठाणे एलिव्हेटेड रेल्वेची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. महत्वाच्या गर्दीच्या मध्य रेल्वेकडे दुर्लक्ष करून पश्चिम आणि हर्बर मार्गाना मात्र भरघोस देण्याचा प्रयत्न केला आहे. एकुणच घोर निराशा असणारे हा रेल्वे अर्थसंकल्प आहे, असे म्हणावे लागले.
– आनंद परांजपे, माजी खासदार

रेल्वे अर्थसंकल्प मांडताना मी काही जादूगार नाही, त्यामुळे मी स्वप्ने दाखवू शकत नाही, असे रेल्वेमंत्र्यांचे म्हणणे आम्हाला मान्य आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या किमान त्यांची तरी पूर्तता करण्यात यावी. आजवर झालेल्या घोषणा जरी पूर्ण झाल्या तरीदेखील येथील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकेल. आमच्या प्रवाशांचे रोजच्या प्रवासात हाल होत असून त्यांचा जीव जात आहे. या प्रवाशांना जीवनदान द्यावे अशी मागणी आता रेल्वेमंत्र्यांकडे करण्याची वेळ आली आहे.
– लता अरगडे, उपाध्यक्ष रेल्वे प्रवासी महासंघ

रेल्वे अर्थसंकल्प संतुलित असून रेल्वेतून होणाऱ्या मृत्यूबद्दल रेल्वेमंत्र्यांनी गांभीर्य व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील असूनही देशाला समोर ठेवून सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्प मांडला ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र गेल्या संकल्पात एमयूटीपी-२ प्रकल्पांतर्गत ७२ रेक्स मिळणार होते. ते मिळाले तर नाहीच, मात्र ते कधी मिळणार याचा उल्लेखदेखील यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. यामुळे मुंबईकर प्रवाशांची निराशाच झाली आहे. आम्हाला नवीन स्वप्ने दाखवली नाहीत तरी चालतील, मात्र जी यापूर्वी दाखवली आहेत ती साकार होणे हे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र एकंदरीत रेल्वे अर्थसंकल्प हा राष्ट्राला समोर ठेवून केला गेला आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.
– सुभाष गुप्ता, अध्यक्ष, यात्री संघ

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून उपनगरीय रेल्वे प्रवाशांची निराशा झाली आहे. मुंबईसाठी नव्याने कोणतीही ठोस तरतूद करण्यात आली नसून उपनगरीय रेल्वेतील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्या लोकल फेऱ्यांची घोषणा होईल अशी आमची अपेक्षा होती, मात्र अशी घोषणाच न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. कारण फेऱ्या वाढल्या असत्या तर रेल्वेतून होणाऱ्या अपघातांना आळा बसू शकला असता, पण अर्थसंकल्प मांडताना या महत्त्वाच्या बाबीचा विचारच करण्यात आला नाही. दिव्यात गेल्या २ जानेवारीला झालेल्या आंदोलनानंतर या घटनेची दखल घेत रेल्वेमंत्री स्वत: ठाण्याला आले होते. त्यामुळे त्यानंतर दिवा-सीएसटी लोकल सुरू होईल अशी आम्हाला आशा होती. मात्र अशा लोकलचीही घोषणा करण्यात आलेली नाही.
– आदेश भगत, दिवा रेल्वे प्रवासी संघटना

कोणतीही भाडेवाढ केली नाही ही एकमेव आशादायक बाब सोडली तर सुरेश प्रभूंचे बजेट हे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. ठाणे-कल्याण रखडलेली पाचवी सहावी मार्गिका, कल्याण कसारा तिसरी मार्गिका अशा अनेक मागण्यांना पूर्णपणे बगल देण्यात आली आहे. नव्या लोकल फेऱ्या, महिलांची सुरक्षा व अपघातांच्या घटनांवर केवळ मगरीचे अश्रू ढाळण्याव्यतिरिक्त काहीच घडलेले नाही. हे निषेधार्थ आहे.
– श्याम उबाळे, सचिव कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

उपनगरीय रेल्वे सेवेतील ठाण्यापलीकडच्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा न्याय प्रवाशांना मिळालेला नाही. मागच्या घोषणांची पूर्तता करणार इतके तुटक आश्वासन या निमित्ताने मिळाले असले तरी तेही पुरेसे नाही. वायफाय, अत्याधुनिक स्थानके याची कोणतीच गरज आम्हाला नाही. केवळ रेल्वे उड्डाणपूल आणि जास्तीच्या फेऱ्या हव्या असून त्याही मिळत नाही ते दुर्दैवी आहे. एकूण अपेक्षाभंग करणारा रेल्वे अर्थसंकल्प आहे, असे म्हणावे लागेल.
– राजेश घनघाव, प्रवक्ते, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

या वर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेला अर्थसंकल्प निराशाजनक असून या संकल्पात महाराष्ट्राला ठेंगा दाखविण्यात आला आहे. इतका निराशाजनक अर्थसंकल्प यापूर्वी आमच्या पाहण्यात आलेला नसून महाराष्ट्रातील खासदारांनी याबद्दल आवाज उठविला पाहिजे. कल्याण, कर्जत, कसारा या भागांतील प्रवाशांना कोणताच लाभ नसून एमयूटीपीअंतर्गत पूर्वी घोषणा करण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी यंदा कोणतीही तरतूद नाही. रेल्वे अपघातांना आळा बसण्यासाठी ठोस उपाय करण्यात आलेले नाहीत. बुलेट ट्रेनमध्ये प्रवाशांच्या स्वागतासाठी हवाईसुंदऱ्यांसारख्या स्त्रिया सेवेला असणार यामुळे हा संकल्प केवळ श्रीमंतांसाठी आहे की काय, असा संशयही येतो.
– नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघ

कल्याण पलिकडच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना अपेक्षा होत्या. रेल्वे मार्गीका वाढवण्यासारख्या कामाला गती देण्यात येईल असे वाटले होते. मात्र असे कोणत्याच गोष्टी समाविष्ट नाहीत. ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने सगळाच ठणठणाट असल्याचे जाणवते.
जितेंद्र विशे, कल्याण-कसारा प्रवासी संघटना