|| आशीष धनगर
पांढऱ्या दिव्यांमुळे दुरूनही लोकलच्या वेळा पाहता येणार; वीजवापरातही बचत:- लाल रंगाच्या लहान लहान दिव्यांनिशी बनलेल्या जुन्या इंडिकेटरना सोडचिठ्ठी देऊन मध्य रेल्वेने पांढऱ्या रंगाचे दिवे असलेले नवीन इंडिकेटर बसवण्यास सुरुवात केली आहे. या इंडिकेटरवर दर्शवले जाणारे लोकलचे नाव आणि वेळ दुरूनही पाहता येणार आहे. तसेच या इंडिकेटरमुळे विजेचीही बचत होणार आहे. अशा प्रकारचे ३० इंडिकेटर ठाणे रेल्वे स्थानकात बसवण्यात येणार आहेत.
प्रवाशांना लांबूनही लोकलच्या वेळा दिसाव्यात तसेच पावसाळ्यात इंडिकेटर वारंवार बंद पडू नयेत यासाठी काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये पांढऱ्या रंगाचे अत्याधुनिक इंडिकेटर बसविण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारचे नवे इंडिकेटर गर्दीचे मानले जाणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकातही बसविण्यात येणार आहेत. स्थानकातील एकूण दहा फलाटांवर प्रत्येकी दोन असे हे नवे इंडिकेटर बसवण्यात येणार आहेत. तर जलद मार्गावरील फलाटांवर एक जादा इंडिकेटर बसवण्यात येणार असून पादचारी पुलांवरही हे इंडिकेटर बसविण्यात येणार आहेत. या नव्या इंडिकेटरचे काम दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘ठाणे रेल्वे स्थानकात नव्याने ३० इंडिकेटर बसवण्यात येणार असून ही नवी प्रणाली लवकरात लवकर सुरू करण्यात येईल,’ असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिल कुमार जैन यांनी सांगितले.
नव्या इंडिकेटरची वैशिष्टय़े
- जुन्या इंडिकेटरच्या तुलनेत अधिक वीजबचत.
- लोकल येण्यास अपेक्षित कालावधीही प्रदर्शित करणार.
- ‘ऑप्टिकल फायबर’ तंत्रज्ञानाद्वारे इंडिकेटरचे नियंत्रण.
- रेल्वेला आपत्कालीन संदेश पाठवण्याची स्वयंचलित सुविधा.
- वर्षभरात अन्य रेल्वे स्थानकांत उभारणी.