कल्याण-डोंबिवलीतील नऊ स्थानकांच्या परिसरात कार्यवाही

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील तब्बल नऊ रेल्वे स्थानकालगत २००० मीटर अंतराच्या संपूर्ण परिसरात यापुढे फेरीवाले आणि वाहनांच्या पार्किंगला बंदी घालण्याचे महत्त्वपूर्ण धोरण आयुक्त ई. रवींद्रन यांनी तयार केले असून या अंतरापुढील एक मार्गिका फेरीवाले आणि पादचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. महापालिकेने आखलेल्या पार्किंग धोरणाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. याशिवाय रेल्वे स्थानक परिसर कोंडीमुक्त व्हावा याकरिता स्थानकालगत बांधण्यात आलेल्या स्कायवॉकखाली दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ सुविधा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने सहा महिन्यांपूवी सादर केलेल्या अर्थसंकल्पात येथील रेल्वे स्थानकांचा परिसर फेरीवाला तसेच कोंडीमुक्त करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली होती. या काळात फेरीवाला हटाव पथकामार्फत रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात वेळोवेळी कारवाई होत असली तरी नव्या पार्किंग धोरणाच्या माध्यमातून यासंबंधी ठोस पावले उचलण्याचा निर्णय महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण, डोंबिवली, आंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, शहाड, कोपर तसेच निळजे रेल्वे स्थानकांचा परिसर येतो. त्यामुळे पार्किंग धोरण तयार करताना केवळ कल्याण आणि डोंबिवली अशा दोन रेल्वे स्थानकांचा विचार करण्याऐवजी इतर सात रेल्वे स्थानक परिसराचाही विचार करण्यात आला आहे. सध्या या स्थानकांच्या परिसराला बेशिस्त पार्किंग आणि फेरीवाल्यांचा विळखा आहे. नव्या पार्किंग धोरणाचा आधार घेत बेकायदा फेरीवाले आणि वाहनतळांवरही कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून महापालिकेच्या इतिहासात प्रथमच यासंबंधी काही मीटर अंतराच्या त्रिज्या ठरविण्यात आल्या आहेत.

उपायांची जंत्रीच

’ नव्या पार्किंग धोरणानुसार महापालिका हद्दीतील नऊ रेल्वे स्थानकापासून २०० मीटर त्रिज्येमधील रस्त्यांचा समावेश ‘अ’ वर्गात करण्यात आला असून हा संपूर्ण पट्टा ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

’ रेल्वे स्थानकालगत २०० मीटर परिसरात फेरीवाले तसेच खासगी चारचाकी, दुचाकी वाहनांना पार्किंगसाठी पूर्णपणे बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

’ रेल्वे स्थानकालगत खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या पिकअप आणि ड्रॉपसाठी स्वतंत्र जागा आखण्याचे ठरविण्यात आले असून यासाठी वाहतूक पोलीस तसेच परिवहन विभागासोबत एकत्रित प्रस्तावाची आखणी केली जात आहे.

’ रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या तसेच समांतर रस्त्याच्या कडेला पार्किंगसाठी मज्जाव करताना रस्त्याच्या कडेला फक्त बस आणि रिक्षा थांब्यांना परवानगी देण्यात येणार आहे. या संपूर्ण पट्टय़ात निवासी वाहनांच्या पार्किंगलाही मज्जाव करण्यात आला आहे.

’ या परिसरात महापालिकेमार्फत किंवा खासगीरीत्या बांधिव पार्किंग क्षेत्रातच ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ सेवा अनुज्ञेय करण्यात येणार आहे. यापैकी काही नियम यापूर्वीच लागू करण्यात आले असले तरी नव्या धोरणात र्सवकष अशी योजना तयार करण्यात आली आहे.