ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी वाढला. सोमवार दुपारनंतर आणि मंगळवारी शहरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारप्रमाणेच मंगळवारी शहरात पावसाचा जोर कायम होता. ठाणे शहरात गेल्या २८ तासात २८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, गेल्या चार तासात ६२ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक परिसर जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ठाणे शहरात शनिवारपासून पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर पाऊस पडत होता. सोमवारी सकाळी पावसाची रिपरिप सुरु होती. सकाळी १० वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. दुपारी ४ वाजेनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मंगळवारी पहाटेपासून पाऊस सुरूच आहे. सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत अतिवृष्टीसारखा पाऊस पडत होता. या काळात ३८ मीमी इतका पाऊस झाला.
ठाणे शहरात गेल्या २८ तासात २८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, गेल्या चार तासात ६२ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. पावसासोबत सोसाट्याचा वारा असल्याने वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचा भाग पडला. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले तर, घोडबंदर तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला.
ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, दातिवली, गणेशपाडा, डायघर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. कोपरी येथील रामभाऊ मार्ग, येऊर येथील कोपरकर बंगल्याजवळील परिसर, येऊर गाव, माजिवाडा येथील साईनाथ नगर, कोर्टनाका येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय परिसर, तहसीलदार कार्यालय परिसर, शीळफाटा रोड, खर्डी दिवा रोड, ठाण्यातील श्रीरंग विद्यालय आणि सोसायटी परिसर, घोडबंदर चेना पुल, वृंदावन परिसर, ठाण्यातील आंबेडकरनगर येथील नाला परिसर, कासारवडवली येथील टायटन रु्गणालयाच्या मागील परिसर, मुंब्रा देवी काॅलनी परिसर याठिकाणी पाणी साचले होते. कोपरी आनंदनगर बुद्ध विहार परिसर, भाईंदरपाडा भागात घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
हिरानंदानी इस्टेट जवळील श्री माॅ शाळेची संरक्षक भिंत कोसळली, कळवा येथील पारसिकनगर भागातील ओझोन व्हॅली सोसायटीजवळील नाल्याची भिंत कोसळली. मुंब्रा येथील संजयनगरमधील नाशिक वाॅर्ड चाळीतील घराची भिंत पडली. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नाही. लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ येथील संतोष पाटील नगरमधील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या घरावर दरड कोसळली. यात जय मातेरे यांच्या घराचे नुकसान झाले असून यात अमरनाथ शर्मा (७०) हे जखमी झाल्याने त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथील चार खोल्या रिकाम्या करण्यात आल्या असून येथील नागरिक नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत.