मनसेतील पक्षांतर्गत गटबाजीमुळे बदलापूर, उल्हासनगर शहराची कार्यकारिणी ठाकरे यांनी बरखास्त केली. रविवारी अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहराच्या दौऱ्यावर असताना ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला. येत्या १० दिवसात नवी कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत गटबाजीला उत आला होता. त्यावरून ठाकरे यांनी पदाधिकारी बैठकीत खडे बोल सुनावले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा >>> अंबरनाथ: “मतदारांना गृहीत धरू नका, कर्नाटकातील पराभव भाजपच्या वागणुकीचा”, राज ठाकरे यांचा टोला

रविवारी राज ठाकरे यांनी अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांना भेट दिली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्ष संघटना आणि पक्ष बांधणी बाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे यांच्या स्वागतापूर्वी शहरात झळकलेल्या बॅनर वरून पक्षांतर्गत गटबाजी समोर आली होती . त्यामुळे ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते. अंबरनाथ येथे माध्यमांशी बोलताना त्यांना गटबाजी बद्दल विचारले असता त्यांनी परखड मत व्यक्त केले होते. कुणाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष काढलेला नाही. अहंपणा असलेला व्यक्ती यापुढे पदावर राहणार नाही.

हेही वाचा >>> कल्याणमधील रेतीबंदर भागात दुचाकीच्या डीकीतून सहा किलो गांजा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षातील गटबाजी यापुढे दिसणार नाही, असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र बदलापूर येथे गेल्यानंतर पुन्हा त्यांना पदाधिकाऱ्यांनी गटबाजीबद्दल सांगितले. तर उल्हासनगर शहरातही अशीच गटबाजी असल्याचे समोर आले. अखेर राज ठाकरे यांनी बदलापूर आणि उल्हासनगर शहराची कार्यकारिणी बरखास्त केली. येत्या दहा दिवसात नवी कार्यकारिणी जाहीर करण्याचे आदेश आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच पक्षात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.