कल्याण – येत्या लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहात ना. लोकसभा निवडणूक लढवावी का. लढवायची असल्यास स्वबळावर की अन्य पक्षासोबत लढवायची, असे प्रश्न करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर येथील स्प्रिंग टाईममधील बैठकीत चर्चा केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी राज दोन दिवसांच्या कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर आले आहेत. राज शनिवारी कल्याण लोकसभेसंदर्भात डोंबिवली परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत.
हेही वाचा >>>चित्रफित बनविताना भिवंडीतील तरुणाची माणकोली पुलावरून खाडीत उडी
या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. अनेक पदाधिकाऱ्यांनी या भागात मनसेचे वर्चस्व असून स्वतंत्र बाण्याने निवडणूक लढविण्याची मते व्यक्त केली. काहींनी अन्य पक्षाशी युती करून निवडणूक लढविली तर अधिक संख्या बळाने निवडून येऊ, असे स्पष्ट केले. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर तात्काळ मते व्यक्त केली नाहीत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कल्याण, भिवंडी लोकसभेसाठी महायुती, महा विकास आघाडी यांची परिस्थिती पाहून या मतदारसंघात मनसे म्हणून काय भूमिका घेता येऊ शकते, याची चाचपणी या दोन दिवसाच्या दौऱ्यात राज ठाकरे करणार असल्याचे मनसेच्या एका नेत्याने सांगितले.
हेही वाचा >>>मनसेचे फटाके, राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी फोडले; कल्याणमध्ये कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाची फजिती
या बैठकीला शहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष अशा मोजक्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कशी लढवायची, याच विषयावर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना प्रश्न केले. आपल्या विभागातील पदाधिकाऱ्यांची माहिती लवकर जमा करा, त्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करून असे राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
मनसे कार्यकर्त्यांच्या मनात आमदार प्रमोद पाटील यांनी कल्याण लोकसभेची निवडणूक लढवावी, अशीच मते आहेत, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. या बैठकीत मनसे नेते अविनाश अभ्यंकर, आमदार प्रमोद पाटील सहभागी झाले होते.