Raj Thackeray Uttar Sabha : राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामध्ये अजानविषयी मांडलेल्या भूमिकेवरून सध्या जोरदार राजकारण सुरू झालं आहे. राज ठाकरे हे मुस्लिमविरोधी भूमिका घेत असून हिंदुत्ववादाता आक्रमक पुरस्कार करत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली. मनसे ही भाजपाची बी टीम असल्याचं देखील बोललं गेलं. यासंदर्भात आज राज ठाकरेंची ठाण्यात ‘उत्तर’ सभा आयोजित करण्यात आली. यासंदर्भात बोलताना मनसेचे नाशिकमधील नेते आणि माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकांचं समर्थन केलं आहे. तसेच, राज ठाकरे कधीही मुस्लिमांच्या विरोधी नव्हते, असं ते म्हणाले आहेत.
“२ तारखेला पाडव्याला राज ठाकरेंची सभा झाली आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं. माध्यमांचे लोक आमची प्रतिक्रिया जाणून घेत होते. आम्ही कायद्यावर बोट ठेवून बोललो. अनेक ठिकाणी सोशल मीडियावर माझ्याविरोधात प्रचार केला गेला. माझा डीएनए देखील चेक करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना उत्तर देतो. जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांचा माझा डीएनए आहे”, असं सलीम शेख म्हणाले.
राज ठाकरेंच्या भूमिकेचं केलं समर्थन!
दरम्यान, यावेळी बोलताना सलीम शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन केलं. “नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती, तेव्हा राज ठाकरेंनी माझी जात न बघता मला तिथे सभागृह नेता केलं. राज ठाकरे त्यावरही थांबले नाहीत. नाशिक महानगर पालिकेची स्थायी समितीचं सभापती देखील मला केलं. गटनेता केलं. ते कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हते, यापुढेही राहणार नाही”, असं सलीम शेख म्हणाले.
“वसंत मोरे पुण्यातले नेते आहेत. तिथे झालेली कब्रस्थान, धर्मादाय दवाखाना याला मुस्लीम धर्मगुरूंचं नाव दिलं आहे. त्याचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते झालंय”, असं उदाहरण देखील सलीम शेख यांनी दिलं.