ठाणे : येथील राज्यभिषेक समारोह संस्थेच्यावतीने ऐतिहासिक गडकिल्ल्यांची जोपासना आणि परंपरेचे संवर्धन यानिमित्त दुर्ग बांधणी स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेत विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी योगदान देणारे पराक्रमी सरदारांच्या वंशजांच्या हस्ते विजेते आणि सहभागींना सन्मानित करण्यात आले.
दिवाळी सण म्हटले की किल्ले बांधणी करणे हे समीकरण पूर्वीपासून चालत आले आहे. विविध गावांमध्ये अजूनही दिवाळीच्या आधी किल्ले साकारण्याची, ते सजवण्याची परंपरा कायम आहे. हीच परंपरा शहरी भागातही जोपासली जावी म्हणुन ठाणे शहरातील राज्याभिषेक समारोह संस्थेच्यावतीने दुर्ग बांधणी हा उपक्रम राबविला जातो. दरवर्षी या उपक्रमात ठाणे शहरासह इतर शहरातील स्पर्धक सहभागी होत असतात. यंदाही ठाणेसह मुंबई, कल्याण डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई, अकोला, अमरावती, बुलढाणासह थेट परदेशातूनही स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या उपक्रमाचा १४ वा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शिवव्याख्याते सौरभ कर्डे (पुणे) यांचे ‘शिवप्रताप दिन ते शिवराज्याभिषेक दिन’ या विषयावर भाषण झाले. इंद्रजीत जेधे, अनिकेत बांदल, श्रीनिवास इंदलकर, बाळासाहेब सणस, गोरख करंजावणी हे उपस्थित होते. ज्येष्ठ अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रणय शेलार यांच्या संग्रहातील इतिहासात वापरली गेलेली शस्त्रेस प्रमोद काटे यांचे संग्रहित असलेले जुनी नाणी प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच युनेस्कोवर आधारित प्रश्नमंजुषा देखील घेण्यात आली. शिवकालीन शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक नाणी, चलन इतिहास यावरील दोन दिवसीय माहितीपर प्रदर्शन पार पडले.
