ठाणे– शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या शुभारंभासाठी १५ मे ही तारिख ठरविण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी आज, नाट्य कलावंतांसह या नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. या पाहणी नंतर हे नाट्यगृह १५ मे पर्यंत रसिकांसाठी सुरु करण्याचे संकेत देण्यात आले. दरम्यान, नाट्यगृहाच काम बरेचसे अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे हा मूहूर्त साधला जाईल का याविषयी प्रश्नचिन्ह आहे.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. हे ठिकाण शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. १९८० मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून नाट्यगृहाचे बांधकाम जुने झाले होते. काही वर्षांपुर्वी गडकरी रंगायतन नाट्यगृहाची डागडुजी करण्यात आली होती. त्यावेळेस नाट्यगृहातील खुर्च्या बदलणे, बैठक कक्ष नुतनीकरण अशी कोणतीच कामे करण्यात आली नव्हती. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पासून नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पालिकेने पुन्हा हाती घेतले असून या कामामुळे नाट्यगृह कार्यक्रमांसाठी बंद आहे. त्यावेळी हे काम तीन महिन्यात पूर्ण होऊन नाट्यगृह रसिकांसाठी खुले करण्यात येईन असे पालिकेकडून सांगण्यात आले होते. परंतू, प्रत्यक्षात सहा महिने उलटले असले तरी अद्याप या नाट्यगृहाचे काम पूर्ण झालेले नाही.
ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी आज या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी नाट्य दिग्दर्शक विजू माने, नाट्य निर्माते प्रसाद कांबळी आणि अन्य कलाकार उपस्थित होते. खासदार म्हस्के यांनी जवळपास दोन तास कामाची पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. तर काही सूचना देखील त्यांना दिल्या.
नाट्य चळवळीला बळ मिळणार -खासदार नरेश म्हस्के
बदलते ठाणे अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना आहे. त्यादृष्टीने ठाणे आता पूर्णपणे बदलत आहे. केवळ ठाण्यातच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात गडकरी रंगायतन या नाट्यगृहाला महत्व आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कामावर लक्ष ठेऊन असल्याचे नरेश म्हस्के यांनी या पाहणी दरम्यान सांगितले. मे महिन्यात हे नाट्यगृह सुरु होणार असून नाट्यकर्मीना आणि रसिकांना जसे हवे तसे या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे नाट्य चळवळीला बळ मिळणार असल्याचे मत यावेळी म्हस्के यांनी मांडले.
गडकरी रंगायतन अद्यावत होत असल्याचा अभिमान वाटतो – दिग्दर्शक विजू माने
या नूतनीकरणाचे काम करत असताना, नाट्यसंस्थांना आणि कलाकारांना नेमके काय हवे आहे याचा विचार करण्यात आला आहे. ही वास्तू अद्ययावत करण्यात येत असल्याने याचा आम्हाला अभिमान वाटत आहे.