डोंबिवली : डोंबिवली शहरातील अनेक वर्षापासून रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने ६१ कोटी खर्चाचा आराखडा तयार करावा. हा आराखडा शासनाला सादर करून आवश्यक त्या वित्तीय मंजुऱ्या मिळण्यासाठी आपण स्वता पाठपुरावा करू. शासनाकडून हा आराखडा मंजूर करून घेतल्यानंतर, ही विकास कामे शहरात प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी पालिका प्रशासनाने समर्पित भावाने प्रयत्न करावेत, असे आदेश डोंबिवलीचे आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

डोंबिवली शहरातील विकासाचे अनेक प्रकल्प काही वर्षापासून निधी, पुनर्वसन, भूसंपादन, भूखंड विकास अशा अनेक कारणांमुळे रखडले आहेत. ही कामे तातडीने मार्गी लागावीत यासाठी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी, साहाय्यक संचालक नगररचना सुरेंद्र टेंगळे, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे आणि इतर विकास कामांशी संबंधित विभागाचे प्रमुख यांची संयुक्त बैठक सोमवारी आयोजित केली होती.

हेही वाचा…ठाणे रेल्वे स्थानकात आढळली अमली पदार्थाने भरलेली बेवारस बॅग, लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवली पूर्व, पश्चिम येथील मूलभूत सोयीसुुविधांच्या कामासाठी प्रशासनाने २५ कोटीचा आराखडा तयार करावा. कुंभारखाणपाडा राजूनगर येथील आरक्षित भूखंड विकासासाठी १० कोटी, झोपडपट्टी, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १० लक्ष खर्च, टिळकनगरमध्ये अध्यात्म प्रशिक्षणासाठी वेदपाठशाळा उभारणीसाठी १० कोटीचा विकास आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना आमदार चव्हाण यांनी केल्या. ठाकुर्ली पूल बाधितांचे तातडीने योग्यठिकाणी पुनर्वसन करावे. डोंबिवली पश्चिमेतील वर्दळीच्या पाच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला तात्काळ मंजुरी देऊन पालिका खर्चातून ही कामे करावीत. खंबाळपाडा येथील दिवंगत शिवाजी शेलार-चामुंडा मैदान परिसराचा विकास करण्यात यावा. डोंबिवली रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांचे कायमस्वरुपी उच्चाटन करावे.

बाह्य वळण रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे. तीन तलावांचे राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत सुशोभिकरण करावे. कोपरगाव, देवीचापाडा येथील गणेशघाटांची कामे हाती घ्यावीत. मैदान, उद्यान, बगिचा यांची नियमित देखभाल दुरुस्ती करावी. शहरातील वाहतूक कोंडीचा विषय मार्गी लावावा, अशा सूचना आमदार चव्हाण यांनी दिल्या. शहरात सुरू असलेली काँक्रीट रस्ते कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत, पाथर्ली येथे नागरी स्वास्थ केंद्र नुतनीकरणासाठी निधीची तरतूद ठेवावी, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा…कल्याण डोंबिवली पालिकेच्या ६१ शाळांमध्ये ५०२ सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थी, शाळेच्या सुरक्षिततेचा विचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवलीतील शहर विकासाची रखडलेली महत्वाची कामे मार्गी लावण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत अधिकारी, पालिकेच्या अडचणी समजून घेऊन डोंबिवलीतील रखडलेली, चालू असलेली सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. काही निधी शासनाकडून मंजूर करून आणण्याचे नियोजन आहे. रवींद्र चव्हाण प्रदेश कार्याध्यक्ष, भाजप.