– कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, अजब सोहळा माती भिडली आभाळा, उष:काल होता होता यांसारख्या गाजलेल्या गीतांमधून पाश्र्वगायक म्हणून घराघरांत पोहोचलेल्या रवींद्र साठे यांच्याशी गप्पा मारण्याचा योग डोंबिवलीकरांना जुळून आला आहे. चतुरंग प्रतिष्ठान डोंबिवली शाखेच्या वतीने पुन्हा ‘एक कलाकार, एक संध्याकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ पाश्र्वगायक रवींद्र साठे हे डोंबिवलीकरांच्या भेटीला येत आहेत. २९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता सुयोग मंगल कार्यालय, टिळक पथ, डोंबिवली (पू.) येथे हा कार्यक्रम होणार आहे. सुगम गायनात व सर्व संगीत विभागात तब्बल ४२-४३ वर्षे काम केले आहे. आम्ही ठाकरं ठाकरं, वळणवाटातल्या, मी गाताना गीत तुझे लडिवाळा यांसारख्या गीतांसह ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातील गायन, अभिनय व पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्यासह पाच अल्बममधील सोलो गायन, संस्कृत स्तोत्रे, मनाचे श्लोक, भगवतगीता, गुजराथी षोड्शोपचार असे धार्मिक विषयातील अल्बम यांसारख्या विविध पैलूंनी साठे यांची कारकीर्द बहरली आहे.
सेलिब्रिटींशी गप्पा

नाटक, वाद्यांची जुगलबंदी आणि विविध सेलिब्रिटींशी गप्पा अशा कार्यक्रमांची पर्वणी ठाणेकरांना अनुभवायला मिळाणार आहे. प्रारंभ कला अकादमी तर्फे महिलामहोत्सव साजरा होत असून अर्चना देशमुख व प्रेषिता मोरे यांची ढोल व ढोलकी जुगलबंदी, सुधीर गाडगीळ यांचे एकपात्री किस्से कथन, फुलोरा गप्पांचा अंतर्गत शिल्पा मकरंद अनासपुरे, वृंदा गजेंद्र अहिरे, अलका सयाजी शिंदे यांच्या मुलाखती तसेच ‘प्रारंभ’ प्रस्तुत ‘सखी गं सखी’ नाटिका अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद ठाणेकरांना घेता येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री रेणुका शहाणे, आदिती सारंगधर उपस्थित राहणार आहेत.
कधी : रविवार, २९ नोव्हेंबर, वेळ – सकाळी ८.४५ ते दुपारी २
कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे(प.)