प्रत्यक्ष कामावर नसताना कागदोपत्री नोंद; ठेकेदार, अधिकाऱ्यांचा प्रताप; चौकशी सुरू
पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमीचा मोठा घोटाळा श्रमजीवी संघटनेने नुकताच उजेडात आणला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांच्याकडे सादर केलेल्या पुराव्यांमुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
या पाश्र्वभूमीवर वाडा उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. बांधण ग्रामपंचायतीमधील बोगस रस्त्यासोबत इतर कामांचे महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामे केले. वाडा तहसीलदार संदीप चव्हाण आलोंडे येथे गेले असता रस्ते अस्तित्वात नसल्याचे उघड झाले. याचा पंचनामा करताना कामावर मजूर दाखवलेल्या व्यक्ती प्रत्यक्ष कामावर नसल्याचे आढळले आहे. यासंबंधी जबाब नोंदवले असून या प्रकरणी लवकरच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचे समजते.
तालुक्यातील रोजगार हमी योजनेत बोगस मजूर दाखवून बिले काढल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केल्यानंतर पंचायत समिती प्रशासन आणि इतर संबंधितांचे धाबे दणाणले होते. ग्रामपंचायत बांधण येथे गेले सात आठवडे १०१ मजूर कामावर असल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात ३७ मजूर बोगस नोंदवले गेले आहेत आणि त्यांच्या नावे ‘रोहयो’च्या संकेतस्थळावरही नोंद आहे. याउलट काम केलेल्या ३८ मजुरांना मजुरीपासून वंचित ठेवले गेले आहे. १६ नोव्हेंबर रोजी श्रमजीवी संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तरीही गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. बोगस नावे नोंदवलेल्या मजुरांच्या खात्यात पैसे जमा होऊन ते उचललेही गेले
आहेत.
कुटुंब अनभिज्ञ
आलोंडे येथील दळवीपाडा रस्त्याचे काम सुरूकेल्याचे दोन आठवडय़ांपासून दाखविण्यात आले. प्रत्यक्षात कोणतेही काम तेथे झालेले नाही. संजय अगिवले हे येथील सुखवस्तू कुटुंबातील व्यक्ती आहेत. त्यांचा आलिशान बंगला, चार चाकी वाहने, जेसीबी, पोकलेन असे सर्व काही त्यांच्याकडे आहे. प्रशासनाने मात्र त्या कुटुंबाला मजुरांचा दर्जा दिला आहे. त्यांची अंथरुणाला खिळलेली आई सुनंदा कृष्णा अगिवले आणि वडील कृष्णा बेंडू अगिवले कागदोपत्री रोजगार हमीवर काम करताना दिसत आहेत. मात्र याबाबत ते पूर्णपणे अंधारात आहेत. सदाशिव विष्णू अगिवले हे एका पायाने अपंग आहेत आणि ते कामाची प्रतीक्षा करीत असून काम कधी सुरू होईल याच्या चिंतेत आहेत. कागदोपत्री ते गेले दोन आठवडे कामावर असून भिवंडी येथे काम करणारा त्यांचा मुलगा मिलिंद सदाशिव अगिवले आणि शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी शुभांगी सदाशिव अगिवले रोजगार हमीच्या कामांवर दिसत आहेत.
दुग्धव्यावसायिकाचेही नाव
दुसऱ्या एका प्रतीत सांबरे यांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरी इतर मजूर काम करतात. तेही रोजगार हमीच्या कामावर दिसत आहेत. देवनाथ मोहन भोईर एस्टीम नामक कंपनीत कायमस्वरूपी कामगार आहेत. यांचेही नाव मजुरांच्या यादीत आहे. सुरेखा सुरेश बुंदे यांची स्वत:ची झडपोली येथे खाणावळ आहे, त्यांनीही रोजगार हमीवर काम केल्याची नोंद आहे. अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांची माहिती विवेक पंडित यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुराव्यानिशी दिली आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरूझाल्याने अनेक मासे यात अडकणार असल्याचे दिसते. यात ठेकेदार, अधिकारी आणि इतर संबंधित यंत्रणांच्या जबाबदार लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहयोतला भ्रष्टाचार कुपोषणास कारण
जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड येथील आदिवासी रोजगारासाठी स्थलांतरित होतात. त्यामुळे कुपोषण आणि शिक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. श्रमजीवीने गेले तीन महिने गाव-पाडय़ांमध्ये फिरून मजुरांना रोहयोचे काम करण्यास प्रेरित केले आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना एकत्र करून गावातील कोणकोणती कामे रोहयोच्या माध्यमातून करता येतील याचा आराखडा बनवला. ऑक्टोबर महिन्यातच रोजगार हमीची कामे सुरू केली; परिणामी सुमारे पाच हजार मजुरांचे स्थलांतर रोखण्यात श्रमजीवीला यश मिळाले. दुर्दैवाने प्रशासनाकडून असे प्रयत्न होताना दिसत नसल्याची खंत व्यक्त करीत रोजगार हमीतील भ्रष्टाचार हेसुद्धा कुपोषण आणि भूकबळीचे एक प्रमुख कारण असल्याचे मत श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reach peoples working in employment scheme
First published on: 27-11-2015 at 05:49 IST